नाशिक : शिवसेना-भाजपने पुन्हा एकदा सत्ता राखण्यासाठी बांधलेला चंग आणि विरोधकांचेही पणाला लागलेले अस्तित्व पाहता एकेका मतांची जमवाजमव करताना राजकीय पक्षांसह उमेदवारांची धडपड दिसून येत आहे. त्यामुळे यंदा मतांचा टक्का वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आजवर झालेल्या बारा निवडणुकीत १९९५ मध्ये सर्वाधिक ७१.६९ टक्के मतदान नोंदविले गेले होते. त्यावेळी पुरुषांच्या बरोबरीने महिलांनीही मतदानाचा हक्क बजावत विक्रम घडविला होता. तो अद्यापही मोडला गेलेला नाही. २०१४ मध्ये ६४.३३ टक्के मतदान झाले होते. यंदा त्यात भर पडण्यासाठी निवडणूक आयोगही कामाला लागला आहे.
२०१४ मध्ये झालेल्या लोकसभा-विधानसभा निवडणुकीत निवडणूक आयोगाने मतांचा टक्का वाढविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जागृती केली होती. त्याचे परिणाम प्रत्यक्ष मतदानावेळी दिसून आले होते. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही मतांचा टक्का वाढविण्यासाठी प्रयत्न झाले होते. ज्यावेळी परिवर्तनाची चाहूल लागते तेव्हा मतांचा टक्का वाढल्याचा इतिहास आहे. १९७८ मध्ये झालेल्या निवडणुकीत पहिल्यांदा मतांचा टक्का ६७.५९ टक्क्यांवर जाऊन पोहोचला होता. त्यात पुरुष मतदारांची संख्या ७०.४९ टक्के तर महिला मतदारांची टक्केवारी ६४.५५ टक्के इतकी होती. त्यावेळी जनता पक्षाने शंभरहून अधिक जागा मिळविल्या होत्या. त्यानंतर १९९५ मध्ये ७१.६९ टक्के मतदान झाले आणि कॉँग्रेसचे सरकार जावून सेना-भाजप युती सत्तेवर आली. त्यात ७२.६८ टक्के पुरुष तर ७०.६४ टक्के महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.
आजवर नोंदवलेले गेलेले हे सर्वाधिक मतदान ठरले आहे. १९६२ मध्ये झालेल्या पहिल्या निवडणुकीत ६०.३६ टक्के मतदान झाले होते. तर १९६७ मध्ये ६४.८४ टक्के, १९७२ मध्ये ६०.६३ टक्के, १९८० मध्ये ५३.३० टक्के, १९८५ मध्ये ५९.१७ टक्के, १९९० मध्ये ६२.२६ टक्के, १९९९ मध्ये ६०.९५ टक्के, २००४ मध्ये ६३.४४ टक्के, २००९ मध्ये ५९.५० टक्के मतदान नोंदविले गेले. यंदा १९९५ चा मतदानाचा विक्रम मोडला जाणार काय, याबाबत औत्सुक्य वाढले आहे.
सर्वाधिक उमेदवार
१९९५ मध्ये सर्वाधिक मतदान नोंदविले गेले त्याच निवडणुकीत सर्वाधिक मतदार रिंगणात उतरल्याचाही विक्रम आहे. या निवडणुकीत ४७१४ उमेदवार रिंगणात होते. त्यात ४४६७ पुरुष तर २४७ महिला उमेदवारांचा समावेश होता. त्याखालोखाल मागील निवडणुकीत २०१४ मध्ये ४११९ उमेदवारांनी नशिब आजमावले. त्यात ३८४२ पुरुष तर २७७ महिला उमेदवारांचा समावेश होता.यंदा निवडणुकीत ३२३७ उमेदवार रिंगणात असून त्यात २३५ महिला उमेदवार आहेत. भाजपने सर्वाधिक १७ महिलांना उमेदवारी दिली आहे तर त्याखालोखाल कॉँग्रेस-१५, वंचित बहुजन आघाडी १०, राष्टÑवादी ९, शिवसेना-८, मनसे-५ याप्रमाणे महिला उमेदवारांची संख्या आहे.