नाशिक : सोमवारी रात्रीपासून तर मंगळवारी (दि. २) रात्रीपर्यंत झालेल्या पावसाने मागील दहा वर्षांमधील आॅगस्ट महिन्यातील पावसाचे विक्रम मोडीत काढले आहे. या २४ तासांत शहरात २६५, तर ४८ तासांमध्ये ३०६ मिलिमीटर पावसाची नोंद हवामान खात्याने केली आहे. हा विक्रमी पाऊस झाल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे.२००८ साली महापूर आला होता आणि अवघे शहर जलमय झाले होते; तेव्हा पावसाचे प्रमाण शहरात कमी होते. हवामान खात्याने २००८ साली १० आॅगस्टला सकाळपासून तर १३ आॅगस्टपर्यंत सकाळी साडेआठ वाजेपर्यंत २३५.५ मिलिमीटर पाऊस शहरात झाला होता. त्यावेळी धरण क्षेत्रात पावसाचे प्रमाण अधिक होते, त्यामुळे धरणाचा जलसाठा वाढल्याने गोदापात्रात तेव्हाही ४२ हजार क्युसेकपर्यंत विसर्ग करण्यात आला होता. गोदावरीने धोक्याची पातळी ओलांडली आणि अवघे शहर जलमय झाले होते. यावर्षी मात्र दहा जुलै रोजी बारा तासांत १४० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. धरणातून पाण्याचा विसर्ग न करताही कोरड्याठाक पडलेल्या गोदावरी नदीला दोन वर्षांनंतर पहिल्यांदाच पूर आल्याचे नाशिककरांनी बघितले होते. तो दिवस नाशिककरांसाठी ‘सुपर संडे’ ठरला होता. तब्बल वीस दिवसांनंतर सोमवारी (दि. १) मध्यरात्रीपासून शहरासह संपूर्ण जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आणि गंगापूर ठरणाचा जलसाठा नव्वद टक्क्यांपर्यंत पोहोचला. मंगळवारी दिवसभर पावसाचा जोर कायम राहिल्याने संध्याकाळपर्यंत नदीपात्रात ४६ हजार ६४२ क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला. अहल्यादेवी होळकर पुलाचा अपवाद वगळता गोदावरीवरील सोमेश्वरपासून तर थेट टाकळीपर्यंत सर्वच पूल पाण्याखाली गेले होते. मंगळवारी सकाळी साडेआठ ते संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत १५२ मिलिमीटर पावसाची विक्रमी नोंद झाली. एकूणच धरणक्षेत्रासह शहरातही पावसाचे प्रमाण अधिक राहिल्याने संपूर्ण शहर जलमय झाले होते. उपनगरांमधील प्रत्येक रस्त्यापासून तर शहरातील मध्यवर्ती भागातील रस्त्यांवरही तलाव साचला होता. नाले, उपनद्या ओसंडून वाहू लागल्याने होळकर पुलावरून संध्याकाळपर्यंत ७५ हजार क्युसेक पाणी नदीपात्रात प्रवाहित झाल्याची नोंद पूर नियंत्रण विभागाने के ली. मंगळवारचा पाऊस मागील दहा वर्षांच्या पावसाच्या तुलनेत सर्वाधिक होता, असा निष्कर्ष पेठरोडवरील हवामान खात्याने पर्जन्यमानाच्या नोंदविलेल्या आकडेवारीवरून काढला आहे.
दहा वर्षांमधील सर्वात विक्रमी पाऊस
By admin | Published: August 04, 2016 1:50 AM