नाशिक : शहराच्या कमाल तपमानाचा रविवारी उच्चांक झाला. हंगामातील सर्वाधिक ४०.१ अंश इतके कमाल तपमानाची नोंद नाशिकच्या हवामान खात्याच्या कार्यालयात करण्यात आली. गेल्या बुधवारपासून तपमानाचा पारा ३८च्या घरात होता; मात्र रविवारी पाऱ्याने चाळीशी गाठली. वाढत्या तपमानामुळे नाशिककरांना उन्हाचा तीव्र चटका बसत असून उष्म्याच्या त्रासाने नागरिक हैराण झाले आहे. रविवारी दिवसभर शहरातील सर्वच खासगी कार्यालयांसह दुकानांमध्येही वातानुकूलित यंत्रांच्या वापरावर भर दिला जात होता. त्याचप्रमाणे खासगी क्षेत्रातील नोकरदारांसह बाळगोपाळांकडून शीतपेय व थंड फळहार करून शरीरातील पाण्याची पातळी टिकवून ठेवण्याचा प्रयत्न नाशिककरांकडून केला जात होता. दिवसभर शहरातील सर्वच रस्ते निर्मन्युष्य झाले होते. यामुळे खासगी वाहतूक ीबरोबरच एसटी महामंडळाच्या बसेसमध्येही तुरळक गर्दी दिसून आली. एकूणच नाशिककरांनी रविवारी अकरा वाजेनंतर घराबाहेर पडणे टाळले. वाढत्या उष्म्याबरोबरच वाराही बंद असल्यामुळे नागरिकांच्या जीवाची लाही लाही होत होती.