नाशिक : मागील दहा वर्षांमध्ये नोंदविल्या गेलेल्या कमाल तापमानाचा विक्रम शनिवारी (दि.२७) मागे पडला. मागील आठवडाभरापासून सूर्य आग ओकू लागल्याने नाशिककर अक्षरक्ष: भाजून निघाले आहेत. शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजता हवामान केंद्राकडून ४२.७ अंश इतके उच्चांकी तापमान नोंदविले गेले. १६ एप्रिल २०१० साली ४२ अंश इतके किमान तापमान नोंदविले गेले होते. त्यानंतर नऊ वर्षांनी शनिवारी तापमानाचा पारा ४२ अंशांपुढे सरकला.मागील पाच ते सहा दिवसांपासून शहरवासीयांना उन्हाच्या कडाक्याने हैराण केले असून हवामान खात्याकडून शनिवारी (दि.२७) पुन्हा उष्णतेची लाट येत्या सोमवारपर्यंत (दि.२९) कायम राहणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे पुढील तीन ते चार दिवस नाशिककरांना उष्णतेचा कहर अनुभवयास येण्याची दाट शक्यता आहे. नाशिक, अहमदनगर, जळगाव, सोलापूर, सांगली या जिल्ह्यांमध्ये या चार दिवसांत उष्णतेची लाट अधिक तीव्र स्वरूपात जाणवणार असल्याने नागरिकांनी विशेष खबरदारी घेत उष्माघातापासून स्वत:चा बचाव करण्याच्या घरगुती उपाययोजनांवर भर द्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.बुधवारपासून नाशिककर कडक्याच्या उन्हाचा सामना करत आहेत. ३८ अंशांवरून तापमानाचा पारा थेट चाळिशीपार पोहोचला. ४०.९ अंश इतके तापमान बुधवारी नोंदविले गेले तर गुरुवारी काहीअंशी घट होऊन पारा ४०.५ अंशांवर स्थिरावला; मात्र शुक्रवारपासून अचानकपणे वातावरणात कमालीचा उष्मा वाढल्याने मागील दहा वर्षांपेक्षा अधिक तापमान शनिवारी नोंदविले गेले. दिवसभर शहरातील सर्वच रस्त्यांवर शुकशुकाट पहावयास मिळत होता. सायंकाळी ६ वाजेपर्यंत शहरातील मध्यवर्ती भागातील रस्त्यांवर फारशी वर्दळ दिसून आली नाही. सूर्यास्तानंतरही नाशिककरांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे.कमाल तापमानासोबत किमान तापमानाचा पारादेखील मागील चार वर्षांपासून चढता असून किमान तापमान शुक्रवारी २३.२ अंश इतके होते; मात्र शनिवारी किमान तापमानही २८.६ अंशांवर पोहचल्याने रात्रीही उकाडा जाणवला.
शहरात दहा वर्षांतील सर्वाधिक तापमान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2019 12:41 AM