नाशिक : जिल्ह्याला अवकाळी पावसाने जोरदार झाेडपून काढले. मागील आठवड्यापर्यंत जिल्ह्यात अवकाळीचे ढग दाटून येत असल्याने शेतकरी हवलादिल झाला होता. अवकाळी पाऊस व गारिपटीमुळे शेतपीकांचे मोठे नुकसान झाले. मागील २५ दिवसांत राज्यात सर्वाधिक अवकाळी पाऊसनाशिक जिल्ह्यात झाला असून सुमारे ३८.६मिमी इतका पाऊस पडल्याची नोंद हवामान खात्याने केली आहे. नाशिक जिल्ह्याला अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे. जिल्ह्यात १ मार्चपासून २५मार्चपर्यंत ३८ मिमी इतका पाऊस पडला. राज्यात इतकी नोंद कुठल्याही जिल्ह्यात अद्याप झालेली नाही. यामुळे शेतपीकांचे नुकसानदेखील नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणावर झाले आहे. आतापर्यंत हजारो हेक्टरवरील शेतपिकांचा चिखल झाला आहे.
कांदा, गहू, द्राक्ष, भाजीपाला, आंबा, कांदा रोपे, डाळिंब, हरभरा, टमाटा आदी शेतपीकांची अवकाळी पावसामुळे नासाडी झाली. जिल्ह्यातील शेतकऱ्याच्या हाताशी आलेले पीक डोळ्यांदेखत गेल्याने बळीराजा हादरला. कृषी खात्याकडून अवकाळी पावसाच्या शेतपीकांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम आता अंतीम टप्प्यात आले आहे.
मार्चच्या पहिल्या आठवड्यात गडगडाटी वादळी पावसाने शहरासह जिल्ह्याला झोडपून काढले होते. त्यानंतर काही दिवस पावसाने विश्रांती घेतली; मात्र पुन्हा पंधरवड्यात अवकाळीचे ढग जिल्ह्यावर दाटून येण्यास सुरूवात झाली. १६ मार्च ते २० मार्च या कालावधीत अवकाळी पावसाने जोरदार तडाखा दिला. वीजांचा कडकडाट अन् गडगडाटासह झालेल्या वादळी पावसाने शेतमालाचे मोठे नुकसान झाले. या कालावधीत जिल्ह्यातील काही तालुक्यांत गारपिटीदेखील झाली होती. आतापर्यंत जिल्ह्यात ३८.६ मिमी इतका पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. राज्यात सर्वाधिक अवकाळी पावसाची नोंद या महिन्यात नाशिकमध्ये झाली.
आठवडाभरापासून विश्रांती!अवकाळी पावसाने मागील आठवडाभरापासून विश्रांती घेतली आहे. हवामान कोरडे व आकाश निरभ्र राहू लागल्याने शेतकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. अवकाळी पावसाच्या उघडीपीनंतर जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये शेतकरी शेतीचे झालेले नुकसान द्राक्षबागा, डाळींबागा, टोमॅटोच्या बागांमधील नुकसानीनंतर आवरासावर करताना दिसून येत आहे. फळबागांमधील तुटलेल्या तारा, बांबूंची दुरूस्ती शेतमजुरांनी हाती घेतली आहे.
काही प्रमुख शहरांमधील अवकाळी पाऊस (मि.मी मध्ये)
मुंबई- २५.८पुणे-९.७औरंगाबाद-२९.४सातारा-१०.६सांगली-८.८जळगाव- १२.६अकोला-१४.४परभणी-६.६नागपुर, १.९