नाशिक : केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत शनिवारी होणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग विस्तारीकरणाच्या कामाचे श्रेय घेण्यावरून सेना-भाजपात जुंपली असून, केंद्र सरकारच्या अखत्यारितील या प्रश्नावर सेनेचे खासदार हेमंत गोडसे यांच्या पाठपुराव्याचे यश असल्याचे सेनेने म्हटले आहे तर भाजप आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी गेल्या दीड वर्षापासून आपण केलेल्या प्रयत्नाचे हे फलित असल्याचे म्हटल्याने शहरातील राजकारण रंगले आहे. नाशिकमधून जाणाऱ्या मुंबई-आग्रा या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम केंद्रात व राज्यात कॉँंग्रेस आघाडीची सत्ता असताना झाले असून, सर्वाधिक लांबीच्या उड्डाणपुलाचे उद्घाटनही त्याच काळात करण्यात आले होते. छगन भुजबळ यांच्याकडे त्यावेळी सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्रिपद होते. त्यानंतर मात्र या महामार्गाच्या विस्तारीकरणातून निर्माण झालेल्या वाहतुकीचे प्रश्न प्रकर्षाने समोर आले होते. काही ठिकाणी अंडरपास, काही ठिकाणी उड्डाणपुलाची निर्मिती करण्याबाबतचे अनेक प्रस्ताव राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे देण्यात येऊन त्याचा पाठपुरावाही करण्यात आला, परंतु २०१४ मध्ये केंद्रात व राज्यात सत्तांतर झाल्यानंतर सत्तेवर आलेल्या मंडळींवर ही जबाबदारी आपसूकच येऊन पडली. आता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने महामार्ग विस्तारीकरणातील त्रुटी दूर करण्यासाठी कोट्यवधीची कामे मंजूर केली असून, शनिवारी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या कामांचा शुभारंभ होणार आहे. गडकरी भाजपाचे असल्याने साहजिकच भाजपाचे शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप यांनी या कामांचे श्रेय घेण्यासाठी बुधवारी पक्ष कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन गडकरी यांच्या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. आपण केलेल्या पाठपुराव्यामुळेच या सर्व कामांना मंजुरी मिळाल्याचे सानप यांनी कार्यकर्त्यांना सांगितले तर त्याच वेळी भाजपाच्या आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने मंजूर केलेल्या कामांची यादी प्रसिद्धीमाध्यमांसमोर ठेवून याकामी गेल्या दीड वर्षापासून आपण गडकरी यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्याचे हे यश असल्याचे म्हटले. भाजपाकडून या कामाचे श्रेय घेतले जात असल्याची कुणकुण शिवसेनेला लागताच, खासदार हेमंत गोडसे यांच्या पुढाकारामुळेच नाशिककरांचा त्रास आता कमी होणार असल्याचा दावा शिवसेनेचे महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांनी केला आहे. प्रसिद्धीपत्रक काढून बोरस्ते यांनी, गडकरी यांच्याकडे गोडसे यांनी सातत्याने दिल्ली दरबारी पाठपुरावा केल्याचे हे फलित असल्याचे म्हटले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची दोन वेळा भेट घेऊन आणि अनेक वेळा पत्राद्वारे पाठपुरावा करून या कामांची मंजुरी मिळविली आहे. राजकारणात मी कोणतेही काम श्रेय घेण्यासाठी करीत नाही. - देवयानी फरांदे, आमदारखासदार हेमंत गोडसे यांच्या प्रयत्नांना गडकरी यांनी हिरवा कंदील दर्शविल्यामुळे इतक्या जलदगतीने कामे सुरू होत आहेत. परंतु या कामाचे श्रेय लाटण्याचे कामही काही जण करीत आहेत. - अजय बोरस्ते, महानगरप्रमुख, शिवसेना
महामार्ग विस्तारीकरणातून सेना-भाजपात जुंपली
By admin | Published: November 03, 2016 12:00 AM