ठिकठिकाणी रंगले क्रिकेट सामने
नाशिक : जिल्ह्यातील कोरेानाचा प्रादुर्भाव पूर्णपणे कमी झालेला नाही, त्यामुळे सुरक्षित नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून केले जात असताना शहरातील अनेक भागांत क्रिकेटचे सामने रंगले आहेत. सामने खेळण्यासाठी आणि पाहण्यासाठी गर्दी होत असल्याने डिस्टन्स नियमांचा फज्जा उडत आहे. या प्रकरणी जिल्हा प्रशासनाने कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
खासगी शिवशाही बसवर परिणाम
नाशिक : प्रवासी संख्या कमी होत असल्याने खासगी शिवशाही सेवांवर परिणाम होऊ लागला आहे. अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने शिवशाही कंत्राटदारांकडून बस चालविण्याबाबतची असमर्थता दर्शविली जात आहे. त्यामुळे सध्या महामंडळाच्या शिवशाही बस सुरू असून, पूर्णक्षमतेने बस सुरू होऊ शकलेल्या नाहीत. त्याचा परिणाम उत्पन्नावर देखील झाला आहे.
रोडवरील दुभाजक धोक्याचे
नाशिक : आनंदवल्ली ते सोमेश्वरदरम्यान रस्त्याच्या मधोमध असलेले दुभाजक वाहनांसाठी अडचणीचे ठरत आहेत. काही दुभाजक रस्त्याच्या मधोमध असले तरी पलीकडून जाण्यासाठी रस्ता नसल्याने एकेरी वाहतूक होते. त्यामुळे अनेकदा वाहने समोरासमेार येऊन अपघात होण्याची शक्यता निर्माण होते. झाडांच्या भोवती सुरक्षित कडे केलेले दुभाजकाऐवजी पूर्ण रस्त्यावर दुभाजक टाकण्याची मागणी होत आहे.
घंटागाडी येत नसल्याची तक्रार
नाशिक : उपनगर, शांती पार्क परिसरात घंटागाडीची सुविधा असली तरी त्यामध्ये खंड पडत असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. काही दिवस घंटागाडी नियमित सुरू असते; मात्र घंटागाडी काही दिवस येत नसल्याने महिलावर्गाला कचरा टाकण्यास अडचण निर्माण होते. याबाबत लोकप्रतिनिधींचेही दुर्लक्ष होत असल्याची तक्रार होत आहे.
शोभिवंत रोपे झाली गायब
नाशिक : शरणपूरोडवर तसेच टिळकवाडी येथील रस्त्याच्या कडेला शाेभिवंत झाडे लावण्यात आलेली होती; मात्र केबल खेादकामासाठी रस्त्याच्या कडेला खोदकाम करण्यात आल्यामुळे शाेभिवंत रोपे गायब झाली. पुन्हा रोपे लावण्यात आलेली नसल्याने रस्ता सुशोभीकरण करण्याचा उपक्रम मागे पडला आहे.