सिन्नर : जागतिक कीर्तीचे देवस्थान म्हणून ख्याती मिळविलेल्या शिर्डीच्या साईदरबारात लीन होण्यासाठी देशातूनच नव्हे तर परदेशातूनही साईभक्त येत असतात. गुजरात राज्यासह मुंबई, ठाणे व उपनगरात येणाऱ्या पायी पदयात्रेकरुंची संख्या मोठी आहे. मात्र गेल्या काही वर्षात पदयात्रेकरुंचा वाहनाच्या धडकेत होणारा मृत्यू चिंतेची बाब होऊन बसली आहे. शिर्डीला विविध मार्गाने येणाºया महामार्गावर आजपर्यंत शेकडो पायी साईभक्तांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या अनेक वर्षापासून पायी पालखी मार्गाचे भिजत पडलेले घोंगडे आता दूर करण्याची गरज निर्माण झाली आहे.शिर्डीच्या साई दरबारात अनेक उंची वाहनांद्वारे आणि आता रेल्वे विमानातून येणाºया साईभक्तांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्याचबरोबर गुजरात राज्यासह मुंबई, ठाणे, नाशिक जिल्ह्यासह मुंबईच्या उपनगरातून शिर्डीला वर्षभरात लाखो साईभक्त पायी दिंडीने येऊन साईचरणी नतमस्तक होत असतात. दादरच्या साईसेवक, लालबागची साईलीला अशा अनेक २५ वर्षांहून जुन्या चालत आलेल्या पायी दिंड्यासह नवीन पायी दिंड्या व पालख्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ठाणे, मुंबई व उपनगरातील हजारों साईभक्त गुरुपौर्णिमा, रामनवमी, नववर्ष, गुढीपाडवा त्याचबरोबर अनेक सणांना शिर्डीला पायी येत असतात. १५० ते २०० किलोमीटर पायी चालत आल्यानंतर थकलेल्या साईभक्तांचे घोटी- सिन्नर किंवा सिन्नर-शिर्डी महामार्गावर अनेक अपघात झाले आहेत.
पायी साईभक्तांसाठी महामार्ग ठरतोय ‘जीवघेणा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 5:42 PM