नाशिक : दमणमध्ये उत्पादित मद्याचा मोठा साठा ट्रकमधून चांदवड शिवारातून शहराकडे येणार असल्याची गोपनिय माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्यानाशिक विभागीय भरारी पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून ४७ लाख ६६ हजार ४०० रुपयांचा मद्दसाठा दडवून ठेवलेला ट्रक, गुन्ह्यात वापरलेली स्वीफ्ट मोटार असा एकूण ६५ लाख ९१ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला; मात्र संशयित टोळक्याने चारचाकी, दुचाकीवरुन पाठलाग करत ट्रक घेऊन जाणाऱ्या पथकावर दगडफेक करुन शस्त्रे रोखली. पोलिसांच्या तावडीतून मद्यसाठ्याचा ट्रक ‘हायजॅक’ क रुन संशयितांनी पळविला; मात्र उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने दुस-या पथकाची मदत घेत पाठलाग करुन जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंतमध्ये पुन्हा ट्रक मद्यसाठ्यासह ताब्यात घेण्यास यश मिळविले.
याबाबत पोलीस सुत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, केंद्रशासित प्रदेश असलेल्या दमणनिर्मित मद्यविक्रीस बंदी आहे. तरीदेखील चोरट्यामार्गाने देवळा रस्त्यावर खेलदरी शिवारातून एका ट्रक मधून दमणनिर्मित मद्याची अवैध वाहतूक केली जाणार असल्याची खबर भरारी पथकाला मिळाली. बातमीची खात्री पटल्यानंतर आयुक्त अश्विनी जोशी, संचालक सुनील चव्हाण, उपआयुक्त प्रसाद सुर्वे, चरणसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाचे निरिक्षक एम.बी.चव्हाण, देवदत्त पोटे, कैलास कसबे आदिंनी सापळा रचला. यावेळी संशयित दहा चाकी ट्रक (जी.जे ३१ टी. १५४९) यावर पथकाला संशय आला असता पथकाने तो ट्रक रोखला. पोलिसांनी ट्रकमध्ये चढून पाहणी केली असता जवाच्या पोत्यांमागे मद्याचा साठा आढळून आला. पोलिसांनी याप्रकरणी संशयित जावीद अलाउद्दीन तेली (३१,रा. शास्त्रीनगर, नवापूर), अमर कैैलास वर्मा (२२, रा.जनता पार्क नवापूर), राहूल राजू गायकवाड (२८,रा.चिंचबन, मालेगाव स्टॅन्ड, पंचवटी), शरदभाई नारायण ठाकूर (३७, रा.जयशक्तीनगर, जलालपूर, नवसारी) यांना अटक केली.
असा आहे मद्यसाठारॉयल स्पेशल ओल्ड व्हिस्कीच्या १८० मि.लीच्या एकूण २ हजार ४०० सीलबंद बाटल्यांचे पाचशे खोके (अंदाजे किंमत २८ लाख ८० हजार).जॉन मार्टिन प्रिमियम व्हिस्कीच्या १ हजार ९२० सीलबंद बाटल्यांचे चाळीस खोके (अंदाजे किंमत २ लाख ३० हजार ४००)किंगफिशर स्ट्रॉँग प्रिमियम बियरचे ५०० मिलीचे १३ हजार ८०० सीलबंद टीनचे ५७५ खोके ( अंदाजे किंमत १६ लाख ५६ हजार) असा एकूण ४७ लाख ६६ हजार ४०० रुपयांचा मद्यसाठा पोलिसांनी जप्त केला आहे.