इगतपुरीच्या निसर्गरम्य वातावरणात दोन आलिशान बंगल्यांमध्ये ‘हवाइयन थीम’वर आयोजित करण्यात आलेल्या रेव्ह पार्टीवर अपर पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांनी मिळालेल्या गोपनीय माहितीवरून अधीक्षक सचिन पाटील यांच्या आदेशानुसार त्यांनी उपविभागीय अधिकारी अर्जुन भोसले यांच्यासह इगतपुरी पोलिसांचा फौज फाटा घेत खासगी वाहनांनी धडक देत छापा टाकला. यावेळी अत्यंत तोकड्या कपड्यांमध्ये येथे बारा तरुणी, दहा तरुण अंमलीपदार्थांची नशा करताना आढळून आल्या. हायप्रोफाइल रेव्ह पार्टी असल्याचे पोलिसांच्या लक्षात येताच पोलिसांनी सर्वांचे मोबाइल जप्त करून घेतले. ड्रग्ज, चरस, कोकेनसारख्या पदार्थांचा सर्रास वापर झाल्याचा संशय बळावल्याने अंमलीपदार्थ शोधक श्वानाला पोलिसांनी त्वरित पाचारण करून त्याच्या साहाय्याने सुमारे पाच हजार चौरस फुटांचा बंगल्याचा परिसर पिंजून काढला. यावेळी एका तरुणीच्या खिशात पोलिसांना व्हाइट पावडरही सापडल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, या छाप्यात पांचालही पोलिसांना रंगेहात मिळून आली.
न्यायालयाने सुरुवातील पांचालला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती; मात्र मंगळवारी पुन्हा न्यायालयात पोलिसांनी हजर केले असता पांचालकडून करण्यात आलेला जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावत पोलीस काेठडी ५ जुलैपर्यंत वाढविली. यामुळे पांचालचा कोठडीतील मुक्काम वाढला.
---इन्फो--
‘...हे सगळे नॉर्मल आहे’
जेव्हा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी हिनाची चौकशी सुरू केली तेव्हा पोलीस ठाण्यात तिने चंदेरी दुनियेत याचे फारसे अप्रूप वाटत नाही, अशाप्रकारची मौजमजा ही अगदी सामान्य बाब (नॉर्मल) असल्याचे सांगितले. हे ऐकून पोलिसांनाही आश्चर्याचा धक्काच बसला. दरम्यान, एका अधिकाऱ्याने हे नाशिकमध्ये चालणार नाही, हे लक्षात घ्या, असेही तिला बजावून सांगितल्याची चर्चा आहे.
----इन्फो--
पोलीस कोठडीत असलेल्या १२ महिलांसह अन्य सर्व पुरुषांच्या मुक्कामाची ‘तजवीज’ शहरातील वाडीवऱ्हे, पिंपळगाव बसवंत, ओझर, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी आदी भागातील पोलीस ठाण्यांमधील लॉकअपमध्ये करण्यात आली आहे. दरम्यान, वरीलपैकी एका लॉकअपमध्ये आपल्या मैत्रिणींसोबत असलेल्या हिनाकडून भोजनासाठी सेलिब्रिटी लाइफस्टाइलनुसार पश्चिमात्य खाद्यपदार्थ मिळण्याची विनंतीवजा मागणी पुढे आल्याची चर्चा आहे. पोलिसांनी तिची ही मागणी मात्र फेटाळून लावत ‘जे सर्वांना भोजन दिले जाते, तेच तुम्हालाही मिळेल’, असे ठणकावून सांगितले.