इगतपुरीतील दोन आलिशान बंगल्यांमध्ये अंमली पदार्थांच्या सर्रास सेवनासह मोठ्या संख्येने तरुण-तरुणींनी एकत्र येत दोन दिवसीय पार्टी रंगविल्याची कुणकूण ग्रामीण पोलिसांना लागली. पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या आदेशान्वये अपर पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांनी शनिवारी २६ जून रोजी मध्यरात्रीच्या सुमारास पथकासह बंगल्यांवर छापा मारून पार्टी उधळली होती. यावेळी बंगल्यांमधून संशयित हिना पांचालसह, बॉलिवूडशी संबंधित कोरिओग्राफर, फोटोग्राफर असलेल्या १२ तरुणी, १० तरुण अशा एकूण २२ संशयितांना ताब्यात घेतले होते. दोन दिवसांत या गुन्ह्यात बंगला मालकासह कोकेनसारखे अमली पदार्थ पुरविणारा संशयित सराईत गुन्हेगार नायजेरियन उमाही पीटर यालाही पोलिसांनी मुंबईतून अटक केली होती. त्यामुळे गुन्ह्यातील संशयितांची संख्या २७ वर पोहचली होती. यापैकी अद्यापही दोन संशयितांचा पोलिासांकडून शोध सुरू आहे. पोलिसांनी न्यायालयापुढे एकूण २५ संशयितांना हजर केले होते. त्यापैकी पीयूष आणि हर्ष यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला. पोलिसांना शहा याच्या अंगझडतीत कोकेन मिळाले होते.
दरम्यान, विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी सरकारच्या वतीने युक्तिवाद केला.
--इन्फो--
कोकेनचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न
रेव्ह पार्टीदरम्यान संशयितांनी कोकेनचे सर्रास सेवन केले. पोलिसांचा छापा पडला असता त्यांनी कोकेन बंगल्यांमधील स्विमिंग टँकमध्ये टाकून पुरावादेखील नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी युक्तिवादात सांगितले. यावेळी टँकमधील पाण्याच्या नमुन्याचा तपासणी अहवाल सादर करण्यात आला. या गुन्ह्यातील आणखी पुरावे नष्ट करण्याची भीतीही सरकार पक्षाकडून व्यक्त केली गेली; मात्र त्यास संशयितांच्या वकिलांनी हरकत घेत मुद्दा खोडून काढला. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून घेत न्यायालयाने सेठिया, शहा यांचा अर्ज फेटाळून लावला आणि सर्व १२ महिला संशयितांचा जामीन मंजूर केला.