नाशिक : प्रस्थापित व्यवस्थेकडून सामान्यांच्या होणाऱ्या शोषणावर ‘एक था गधा’ नाटकाद्वारे विडंबनात्मक पद्धतीने भाष्य करण्यात आले. सद्यस्थितीवर विनोदी पद्धतीने चिमटे काढल्याने या नाटकाने रसिकांचे चांगलेच मनोरंजनही केले. महाराष्ट्र राज्य हौशी हिंदी नाट्य स्पर्धेत मुंबई येथील माझगाव डॉक स्पोर्ट्स क्लबच्या वतीने ‘एक था गधा’ हे नाटक रविवारी सादर करण्यात आले. शरद जोशी लिखित व मंगेश पारकर दिग्दर्शित या नाटकाने रसिकांचे मनोरंजन तर केलेच; शिवाय अंतर्मुखही केले. रूपकाच्या माध्यमातून नाटकात कथा सादर करण्यात आली. पूर्वीच्या काळातील हौशी नवाबाभोवती नाटकाची कथा फिरते. कोतवाल, सल्लागार व खूशमस्कऱ्यांचे या नवाबाभोवती नेहमी कोंडाळे असते. त्यांच्यामार्फतच त्याला राज्यातल्या घडामोडी कळत असतात. एकदा राज्यातील अलादाद खॉँ नावाची व्यक्ती मृत्यू पावल्याची माहिती नवाबाला मिळते. अलादाद खॉँच्या अंत्ययात्रेत सहभागी होऊन आपली लोकप्रियता वाढवण्याचा विचार तो करतो; मात्र काही वेळातच अलादाद खॉँ हा माणूस नसून, गाढव असल्याची बाब नवाबाला समजते. त्यावर निर्दयी नवाब या नावाच्या व्यक्तीचा खून करवतो आणि आपले ईप्सित साध्य करतो. सुनील वालावलकर (नवाब), विवेकानंद गाड (अलादाद खॉँ), तुषार घरत (कोतवाल), मयूर कदम (जुग्गन धोबी), उदय पाटकर (सूत्रधार) यांच्यासह आकाश तांबुटकर, आशिष शुक्ला, संतोष काळे, रतिकांत सोनवणे, पूजा बाणे, विद्या गिरकर आदिंच्या प्रमुख भूमिका होत्या. शेखर महाडिक (संगीत), संदीप साटम (प्रकाशयोजना), माणिक कदम (वेशभूषा), तर प्रवीण जावीर यांनी रंगभूषेची जबाबदारी सांभाळली. या महोत्सवात उद्या (दि.१९) सकाळी सोलापूरचे ‘सौदा’, तर सायंकाळी औरंगाबादचे ‘बिंदू से अनंत की ओर’ हे नाटक सादर होईल. देखणे नेपथ्यनाटकातील नेपथ्य व प्रकाशयोजना देखणी होती. हलते नेपथ्य असल्याने ‘ब्लॅकआऊट’ न होताच नेपथ्य बदलत होते. बहुतांश नेपथ्य थर्माकोलच्या सहायाने तयार करण्यात आले असल्याने त्याची हालचाल सुलभरीत्या होत होती. हे नेपथ्य रसिकांचे लक्ष वेधून घेत होते.
हिंदी नाट्य : माझगाव डॉक स्पोर्ट्स क्लबच्यावतीने सादरीकरण
By admin | Published: January 19, 2015 12:01 AM