नाशिक : मदरशांना मिळणारे अनुदान बंद करावे तसेच काश्मिरमध्ये सैनिकांवर दगडफेक करणा-यांविरूद्ध गुन्हे दाखल करावेत यासह विविध मागण्यांसाठी शुक्रवारी हिंदु जनजागृती समितीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयसमोर निदर्शने आंदोलन करण्यात येवून मागण्यांचे निवेदन देण्यात आले.जिल्हाधिका-यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, उत्तर प्रदेशातील शिया सेंट्रल वक्फ बोर्डाचे अध्यक्ष वसीम रिझवी यांनी अलिकडेच मदरशांमध्ये अतिरेकी तयार केले जातात अशी कबुली दिली आहे. त्यामुळे मदरशे हे धार्मिक तेढ निर्माण करणारे केंद्रे बनली असून, सरकारकडून मदरसा आधुनिकीकरण योजनेंतर्गंत प्रत्येक मदरशांना दोन लाख रूपये अनुदान देण्यात येते. अनेक मदरशा चालकांनी मोठ्या प्रमाणावर अनुदानात गैरव्यवहारही केला असल्यामुळे मदरशांना मिळणारे अनुदान बंद करण्यात यावे. त्याच प्रमाणे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने २६ जानेवारी रोजी उत्तर प्रदेशातील कासवगंज येथे तिरंगा यात्रा काढली होती, या यात्रेवर काही समाजकंटकांनी दगडफेक केली व त्यातून जातीय तणाव निर्माण झाला. भारतातच तिरंगा यात्रा काढण्यावर एक प्रकारे बंदी घालावी अशीच समाजकंटकांची कृती असल्यामुळे कासवगंज येथे दगडफेक करणाºयांवर कठोर कारवाई केली जावी अशी मागणीही करण्यात आली आहे. काश्मिरमध्ये गेल्या काही महिन्यांपासून सैनिकांवर दगडफेक करून अतिरेक्यांना पळवून लावण्याचे प्रकार केले जात आहेत, कारवाई करणाºया सैनिकांविरूद्ध पोलीसात गुन्हेही नोंदविले जात आहेत. त्यामुळे सैनिकांचे मनोर्धेर्य खच्चीकरण होत असून, सैनिकांना त्यांच्या मनाप्रमाणे काम करू द्यावे, देशद्रोही कायद्यान्वये दगडफेक करणा-यांविरूद्ध गुन्हे दाखल करावेत व काश्मिरमध्ये राष्टÑपती राजवट लागू करावी अशी मागणीही हिंदु जनजागृती समितीने केली आहे. यावेळी आंदोलनात शशीधर जोशी, वैशाली कातकाडे, रामराव लोंढे, ज्योती पंडीत यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते.