ठाणगाव : गेल्या चार दिवसांपासून सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथील आडवाडी रस्त्यालगत असणारे विद्युत रोहित्र (ट्रान्सफॉर्मर) जळाल्याने निम्मे गाव अंधारात आहे. त्यामुळे ग्रामस्थांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे.गेल्या चार दिवसांपासून आडवाडी रस्त्यालगत असणारा ट्रान्सफॉर्मर जळाल्याने निम्मे गाव अंधारात असल्याने वीज वितरण कंपनीच्या वतीने बुधवारी नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्यात आला होता; परंतु ट्रान्सफॉर्मर कमी अश्वशक्तीचा असल्याने दोन तासांच्या आत पुन्हा विद्युत रोहित्र जळाल्याने निम्मे गाव पुन्हा अंधारात गेले. वीज कंपनीच्या वतीने मात्र एक महिन्याचे वीजबिल थकले तर लगेच वीजप्रवाह खंडित करतात. वीज वितरण कंपनीकडून मात्र १०० अश्वशक्तीने रोहित्र बसविणे गरजेचे असताना कमी अश्वशक्तीचे का बसविण्यात आले असा प्रश्न निर्माण झाला आहे. वीज वितरण कंपनीच्या वतीने या गोष्टीकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. येथील ग्राहकांचे शिष्टमंडळ लवकरच वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन ठाणगावमध्ये होत असलेल्या वीज कंपनीच्या अनागोंदी कारभाराविषयी माहिती देणार आहे.
वीज रोहित्र जळाल्याने निम्मे ठाणगाव अंधारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 1:03 AM