नाशिक : शास्त्रीय संगीत ते भक्तिसंगीत अशा सुमधुर आणि प्रयोगशील स्वरांची मेजवानी सकाळच्या प्रसन्न काळी रसिकांना अनुभवण्यास मिळाली. निमित्त होते सूरविश्वास मैफलीत सुप्रसिद्ध गायक पं. मकरंद हिंगणे यांचे गायन. सूरविश्वासचे सहावे पुष्प त्यांनी गुंफले.सावरकरनगर येथील विश्वास हब येथे हा कार्यक्र म संपन्न झाला. नव्या पिढीतील कलाकारांच्या आविष्काराला हक्काचे व्यासपीठ देण्यासाठी ‘सूर विश्वास’ हा अनोखा उपक्र म सुरू करण्यात आला आहे. मैफलीची सुरुवात आज बधाई बाजे... घनश्याम कृष्णाच्या जन्मानंतर गोकुळात श्रावण मेघांनी आच्छादित वातावरणात जणू सूर्योदय झाला. नंद यशोदेचे सगळे अभिनंदन करू लागले. हा हर्षोल्लास सालगवराली रागाच्या स्वरांनी श्रोत्यांसमोर साकारला. काहीशा अनवट दक्षिण भारतीय संगीतातील या रागानंतर ‘दरस बिन सुनो’ ही बंदिश सादर केली आणि वातावरणात स्वरांनी रिमझिमच जणू सुरू झाली. त्यानंतर ‘रंध्रात पेरिली मी आषाढ दर्द गाणी’ हे पं.जितेंद्र अभिषेकी यांनी गायलेली प्रसिद्ध स्वरचना सादर केली. त्यानंतरच्या ‘आम्हा न कळे ज्ञान’ या चोखोबांच्या रचनेने आणि ‘अवघे गरजे पंढरपूर’ या भक्तिगीताने सभागृह भक्तिमय झाले. कार्यक्रमात संवादिनीवर आनंद अत्रे, तबल्यावर नितीन पवार, सुखदा बेहेरे, केतन इनामदार, अजिंक्य जोशी, शुभंकर हिंगणे, अमोल पाळेकर यांनी साथसंगत केली. कार्यक्र माचे सूत्रसंचालन डॉ. स्मिता मालपुरे यांनी केले. कुसुमाग्रज प्रतिष्ठानवर विश्वस्तपदी निवड झाल्याबद्दल अॅड. अजय निकम यांचा सन्मान विश्वास ठाकूर यांनी केला. आभार प्रदर्शन विनायक रानडे यांनी केले.
हिंगणे यांचा स्वराभिषेक !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2019 1:29 AM