एकलहरे : येथील हिंंगणवेढे-एकलहरे शिव रस्त्यालगत गेल्या चार दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घालत अनेक कुत्र्यांचा फडशा पाडला आहे. ठराविक ठिकाणी बांधलेल्या गाईच्या अवती-भवती बिबट्याचा वावर असल्याने शेतकऱ्यांना रात्र जागून काढावी लागत आहे. बिबट्याचा त्वरित बंदोबस्त करण्यासाठी येथे पिंजरा लावावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.येथील एकलहरे शिवरस्त्यालगत रस्त्याच्या दोन्ही बाजूने शेतकºयांची वस्ती आहे. एकलहरे, हिंगणवेढे व गंगापाडळी अशा तिन्ही गावचे शिवार येथे आहे. या शिवारातील गट नंबर ८६, ८७, ८८ व १०० या ठिकाणी शेतकरी धात्रक कुटुंबीय राहतात. गेल्या चार ते पाच दिवसांपासून या भागात बिबट्याने धुमाकूळ घालून पाळीव कुत्र्यांचा फडशा पाडला आहे. या बिबट्याचे दर्शन रात्री-बेरात्री तर होतेच, पण दिवसा ढवळ्याही तो कुठेतरी शेतात ठाण मांडून बसलेला अनेकांनी पाहिला आहे. या परिसरात उसाची वाढ निम्म्यापेक्षा जास्त उंच झाल्याने तेथे बिबट्याला लपायला मुबलक जागा आहे. त्यामुळे शेतात त्याच्या पंजाचे ठसेही उमटलेले आढळतात. रोज रात्री एकातरी शेतकºयाचे पाळीव कुत्रे बिबट्याचे भक्ष्य बनते. त्यामुळे शेतकरी भयभीत झाले आहेत. शेतातील कामे करताना जीव मुठीत धरूनच जावे लागते. रोजंदारीवर कामासाठी येणारे मजूर ‘ मजुरी नको, पण बिबट्या आवर’ असे म्हणू लागले आहेत.वनखात्याशी संपर्क साधून केली तक्रारबिबट्याच्या वाढत्या उपद्रवाबाबत शेतकºयांनी ग्रामपंचायतीला कळविले असता सरपंच सुमन धात्रक यांनी वनखात्याशी संपर्क साधून कल्पना दिली असता वनविभागाचे वनरक्षक भाऊसाहेब पंढरे यांनी तत्काळ भेट देऊन पाहणी केली. बिबट्याच्या पावलांचे ठशे पाहून शेतकºयांच्या तक्रारी ऐकून पिंजरा लावण्याचे आश्वासन दिले. यावेळी बिबट्यापासून सावध राहण्याची उपाययोजनाही त्यांनी शेतकºयांना सांगितली.हिंगणवेढे शिवारात बिबट्याने धुमाकूळ घातला असुन, आतापर्यंत ४-५ कुत्र्यांचा फडशा पाडला आहे. शेतकरी दहशतीखाली आहेत. शेतमजूरही भीतीमुळे कामावर येत नाहीत. परिसर दहशतमुक्त करण्यासाठी त्वरित पिंजरा लावावा.- सुमन धात्रक, सरपंच, हिंगणवेढेबिबट्याच्या मागे पळू नका, रात्री घराबाहेर झोपू नका, शाळेतील मुलांना घोळक्याने व गलका करत जायला सांगा, घुंगराची मोठी काठी हातात ठेवा, मोबाइल किंवा ट्रान्झिस्टरवर गाणी लावून समूहाने शेतात जावे, बिबट्या दिसल्यास वनविभागास कळवा.- भाऊसाहेब पंढरे, वनरक्षक
हिंगणवेढे-एकलहरे शिवारात बिबट्याचा वावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2019 12:26 AM