काँग्रेसच्या झेंड्याखाली गाठली विधानसभा, ११ गटांत टिकेल का दबदबा?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2022 11:13 AM2022-02-16T11:13:45+5:302022-02-16T11:19:07+5:30
पुरुषोत्तम राठोड घोटी : पंचायत समितीचे उपसभापतिपद व जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापतिपद भूषविल्यानंतर एकदा अपक्ष आणि दुसऱ्यांदा राष्ट्रवादीच्या तिकिटावर ...
पुरुषोत्तम राठोड
घोटी : पंचायत समितीचे उपसभापतिपद व जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापतिपद भूषविल्यानंतर एकदा अपक्ष आणि दुसऱ्यांदा राष्ट्रवादीच्या तिकिटावर आमदारकीसाठी नशीब अजमाविणाऱ्या हिरामण खोसकर यांना काँग्रेसच्या झेंड्याखाली आल्यानंतर विधानसभेत प्रवेश करता येणे शक्य झाले. तोवर गण-गटात कुटुंबीयांनी वर्चस्व प्रस्थापित केले होते. आता मात्र दोन तालुक्यांच्या विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व करताना आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत ११ गटांचा ‘गोवर्धन’ उचलताना खोसकरांची दमछाक होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
नाशिक तालुक्यातून राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने राजकीय प्रवासाला हिरामण खोसकर यांनी सुरुवात केली. १९९७ ला अपक्ष विजयी होऊन पंचायत समिती उपसभापतिपदाची धुरा सांभाळत राजकारणाला सुरुवात केली. गिरणारे गटातून २००२ ला निवडून येऊन तीन वर्षे जिल्हा परिषदेत समाजकल्याण सभापतिपद उपभोगले. पत्नी मैनाबाई यांनी पंचायत समिती सभापती, मुलगी हरसूल गटातून जिल्हा परिषद सदस्य आणि सद्य:स्थितीत नाशिक तालुका गटातून त्यांची सून अपर्णा खोसकर जिल्हा परिषद सदस्य आहेत. त्यांनी २०१४ ला महिला बालकल्याण सभापतिपद भूषवले आहे. खोसकर परिवाराने गोवर्धन व गिरणारे गटात वर्चस्व प्रस्थापित केले आहे. गिरणारे, गोवर्धन गटातून तीन वेळा स्वतः जिल्हा परिषदेत गेलेल्या आमदार खोसकर यांनी दबदबा निर्माण केला आहे. खोसकर यांनी दिंडोरी मतदारसंघात १९९९ ला विधानसभेची अपक्ष निवडणूक लढली. परंतु, त्यांचा सहा हजार मतांनी पराभव झाला. त्यानंतर २०१४ ला इगतपुरी - त्र्यंबकेश्वर मतदारसंघातून नशीब आजमावले. परंतु, त्यांना पुन्हा पराभव पत्करावा लागला. परंतु, दोन्ही तालुक्यांतील दांडगा जनसंपर्क कमी होऊ दिला नाही. त्या संपर्काच्या जोरावरच इगतपुरी तालुक्यातील राजकीय समीकरणे पुन्हा एकदा खोसकर यांनी फिरवली. राष्ट्रवादी सोडून काँग्रेसच्या झेंड्याखाली २०१९ ला विधानसभा सदस्यपदाची माळ खेचून आणली. खोसकरांकडून पराभूत झालेल्या पूर्वाश्रमीच्या काँग्रेसच्या आमदार व मागील विधानसभा निवडणुकीतील शिवसेनेच्या उमेदवार निर्मला गावित या जिल्हा परिषद निवडणुकीत खोसकर यांना शह देण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करण्याची शक्यता आहे.