पंचवटी : पोलीस ठाणे म्हटले तर प्रवेशद्वारापासून तर थेट गुन्हा शोध पथकाच्या खोलीपर्यंत विविध गुन्ह्यांत जप्त केलेली दुचाकी, चारचाकी वाहने, झाडांचा साचलेला पालापाचोळा, विविध कामांसाठी आलेले, परंतु काम न झाल्याने तासन्तास ताटकळत बसलेले नागरिक असेच काहीसे चित्र दिसून येते. मात्र म्हसरूळ पोलीस ठाण्यात पाय ठेवताच आपण पोलीस ठाण्याऐवजी एखाद्या निसर्गरम्य परिसरात तर आलो नाही ना, असा प्रश्न पडतो़ त्याला कारणही तसेच आहे. वर्षभरापूर्वी नव्याने स्थापन करण्यात आलेल्या म्हसरूळ पोलीस ठाण्यात पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने पोलीस ठाण्यात ‘हिरण्य’ उद्यानाची निर्मिती केली आहे. उद्यानात असलेली हिरवळ, बसायला बाकडे, कारंजा आणि अभ्यागत कक्षाची स्थापना, विविध प्रकारची सुंदर फुलझाडे येथे लावण्यात आली असल्याने म्हसरूळ पोलीस ठाणे की उद्यान? असा भास पोलीस ठाण्यात विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांना झाल्याशिवाय राहत नाही. पोलीस ठाण्याला इमारत मिळाली, मात्र आजूबाजूचा परिसर संपूर्ण डंपिंग ग्राउंड असल्याने त्या ठिकाणी उद्यान तयार करण्याची संकल्पना वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेंद्र पिंगळे यांच्या मनात आली आणि उद्याननिर्मिती काम सुरू झाले. पोलीस ठाण्यात उद्यानाबरोबरच व्हॉलीबॉल ग्राउंडदेखील तयार करण्यात आले आहे. पोलीस आयुक्तालयातील म्हसरूळ पोलीस ठाण्यात नागरिकांच्या सहकार्यातून साकारलेल्या उद्यानाचा व व्हॉलीबॉल ग्राउंडचा लोकार्पण पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी पोलीस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील, विजय पाटील, सहायक पोलीस आयुक्त विजयकुमार चव्हाण, सचिन गोरे, म्हसरूळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेंद्र पिंगळे, पंचवटीचे दिनेश बर्डेकर, सरकारवाडाचे डॉ. सीताराम कोल्हे, आडगावचे संजय सानप, अशोक भगत, मधुकर कड आदिंसह पोलीस अधिकारी, कर्मचारी, परिसरातील नागरिक उपस्थित होते. (वार्ताहर)
पोलीस ठाण्यात ‘हिरण्य’ उद्यान
By admin | Published: January 29, 2017 10:21 PM