नाशिक : बसने प्रवास करणाऱ्या स्तनदा मातांना बस स्थानकांमध्ये बाळाला स्तनपान करण्याची सुविधा असावी, यासाठी राज्यातील बस स्थानकांमध्ये हिरकणी कक्षाची स्थापना करण्यात आली, परंतु बस स्थानकांमध्ये असलेले हिरकणी कक्ष केवळ नाममात्र उरले असून, या कक्षाचा वापर भंगार मालाचे साहित्य ठेवण्यासाठी केला जात असल्याचे दिसून आले. नाशिक शहरात जूने सीबीएस बस स्थानकातर हिरकणी कक्षच अस्तित्वात नाही, तर महामार्ग बस स्थानकातील कक्षात स्वच्छतेचे साहित्य, तसेच भंगार माल ठेवण्यात आलेले आहे.
नवीन सीबीएस बस स्थानकामध्ये हिरकणी कक्ष असला, तरी तो किती महिलांना माहीत असावा, याबाबतही शंकाच आहे. चौकशी खिडकीच्या मागेच असा कक्ष आहे, त्यामध्ये बसचे टुसीटर व्यतिरिक्त इतर कोणतीही सुविधा नाही. या कक्षाचा दरवाजा नियमित बंदच ठेवला जातो.
महामार्ग बस स्थानकातील हिरकणी कक्ष नियंत्रण कक्षापासून दूर असल्याने, तसाही तो पूर्वी महिलांसाठी सुरक्षित नव्हताच. कक्ष नजरेस पडत नसल्याचे त्याचा वापर आता झाडू, फिनेल, तुटलेले सीट, दरवाजे ठेवण्यासाठी करण्यात येत आहे. याबाबत विचारणा केली असता, महिलांनी विचारणा केली, तर जागा उपलब्ध करून दिली जाते, असे सांगण्यात आले.
--इन्फो--
७० टक्के महिला अनभिज्ञ
महामार्ग, तसेच नवीन सीबीएस येथील महिलांना हिरकणी कक्षाविषयी विचारले असता, बस स्थानकात असलेल्या सुमारे ७० टक्के महिलांना हिरकणी कक्षाची माहितीच नाही. ज्या महिलांना माहिती आहे, त्यांनी कक्ष कधीच पाहिला नसल्याचे सांगितले. विशेष म्हणजे, बस स्थानकांमधील कक्ष स्वच्छ आणि सुरक्षित असेल, याविषयीच महिलांनी शंका उपस्थित केली. महामार्ग, तसेच नवीन सीबीएस येथील महिलांना हिरकणी कक्षाविषयी विचारले असता, बस स्थानकात असलेल्या सुमारे ७० टक्के महिलांना हिरकणी कक्षाची माहितीच नाही. ज्या महिलांना माहिती आहे, त्यांनी कक्ष कधीच पाहिला नसल्याचे सांगितले. विशेष म्हणजे बस स्थानकांमधील कक्ष स्वच्छ आणि सुरक्षित असेल, याविषयीच महिलांनी शंका उपस्थित केली.