लासलगाव : प्रत्येकाच्या मनात आपल्या गावाविषयी आदरभाव, अभिमान तर असतोच त्याच बरोबर जिज्ञासा देखील असते. आपल्या गावातील ऐतिहासिक वास्तु, मंदिरे, वाडे, स्तंभ, समाधी स्थळ, किल्ला, नदी या आणि अशा कितीतरी गोष्टी कुतूहल वाढवणाऱ्या असतात. आपल्या गावातील या ऐतिहासिक स्थळांचा काय इतिहास असेल या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे लासलगावकरांना हॅरिटेज वॉक द्वारे मिळाली.इतिहास अभ्यासक संजय बिरार यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या हॅरिटेज वॉकमध्ये विद्यार्थ्यांसह नागरिकांनी लासलगावातील ऐतिहासिक स्थळांचा इतिहास समजून घेतला. बाजारतळ येथील पुरातन श्री महादेव मंदिर येथून हॅरिटेज वॉकला सुरूवात झाली. तिथून पुढे बारवजवळ येऊन बारवाची आणि तिथे असलेल्या पुरातन शिलालेखाची तसेच समोरच असलेल्या गावची पुरातन वेस याची माहिती संजय बिरार यांनी दिली. याशिवाय, नदी लगत भग्नावस्थेत उभ्या असलेल्या, पण अजूनही इतिहासाची साक्ष देत असलेला शिलालेख सर्वांनी पाहिला. गावाला पुराच्या पाण्यापासून वाचवण्यासाठी केलेल्या तटबंदीच्या प्रित्यर्थ स्तंभ उभारल्याची माहिती संजय बिरार यांनी दिली. कवी नुमान शेख यांनी त्या स्तंभाच्या अवस्थेबद्दल हळहळ व्यक्त केली. नदी ओलांडून पिंपळगाव(नजिक) येथील ऐतिहासिक समाधी स्थळाची माहिती देण्यात आली. या हॅरिटेज वॉकमध्ये सरस्वती शाळेचे मुख्याध्यापक महाले, कवी नुमान शेख, विजय कुंदे, निलेश देसाई, अपुर्व कुलकर्णी, परेश जाधव यांचेसह सरस्वती शाळेचे विद्यार्थी, विद्यार्थीनी, शिक्षक वृंद आणि गावकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
हेरिटेज वॉकद्वारे उलगडला लासलगावचा इतिहास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2019 4:54 PM
गाव समजून घेताना..: ऐतिहासिक स्थळांना भेटी
ठळक मुद्दे पुरातन शिलालेखाची तसेच समोरच असलेल्या गावची पुरातन वेस याची माहिती संजय बिरार यांनी दिली