नाशिकरोड : जेलरोड मॉडेल कॉलनी येथे शिवम बुट या दुकानात चप्पल बदलण्याच्या कारणावरून वाद घालून दुकान मालकास मारहाण व दुकानात मोडतोड करून गल्ल्यातील सहा हजार रुपये बळजबरीने काढून घेतल्या प्रकरणी सात जणांविरुद्ध उपनगर पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये तिघा युवतींचा समावेश आहे.जेलरोड पिंटो कॉलनी येथे राहणारे मनोहर वाळू भागवत यांचे जेलरोड मॉडेल कॉलनीसमोर टर्ले चेंबरमध्ये शिवम बुट नावाचे दुकान आहे. भागवत यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, बुधवारी दुपारी कोमल भालचंद्र गायकवाड व किरण सुनील वर्मा या दोघी चप्पल खरेदी करून गेल्या होत्या. रात्री ९ वाजेच्या सुमारास त्या दोघी पुन्हा चप्पल बदलून घेण्यासाठी आल्या होत्या. भागवत चप्पल बदलून देत असताना कोमल व किरण या दोघींनी कुरापत काढून वाद घालत मारहाण केली. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात कोमल गायकवाड, किरण वर्मा, प्रीती अनिल भालेराव या तीन युवतींसह कृष्णा अरुण जाधव, प्रशांत पोपट शिराळ, नवनाथ चिंधे, विशाल शिरसाठ यांच्याविरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोमल, किरण, प्रीती, अरुण जाधव, प्रशांत शिराळ या पाच जणांना नाशिकरोड न्यायालयासमोर उभे केले असता सोमवारपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
दुकानाची तोडफोड करून मालकास मारहाण
By admin | Published: April 07, 2017 1:39 AM