------------------------
शिक्षणाधिकाऱ्यांकडून कामकाजाचा आढावा
नांदगाव : तालुक्यातील विविध शाळांना जिल्हा शिक्षणाधिकारी राजीव म्हसकर यांनी आकस्मिक भेटी देत, शालेय कामकाजाचा आढावा घेतला. या अंतर्गत त्यांनी जामदरी येथील तळे वस्तीवरील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेला भेट दिली. शाळेच्या आवारातील वृक्षारोपण व अन्य शैक्षणिक कामकाज बघून समाधान व्यक्त केले. जिल्हा परिषदेचे सदस्य रमेश बोरसे हे शिक्षणाधिकारी म्हसकर यांच्या सोबत होते. सामाजिक कार्यकर्त्या संगीता साळी यांनी विविध प्रकारच्या शालेय वस्तू दिल्यात, त्यांचे वितरण व वृक्षारोपण आणि गरजू विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वाटप प्रभारी गटशिक्षणाधिकारी प्रमोद चिंचोले, शिक्षण विस्तार अधिकारी नंदा ठोके, किशोर सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी साकोरा येथील मुख्याध्यापक राजकुमार बोरसे, कासीम शेख, गणेश इनामदार, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य उपस्थित होते. मुख्याध्यापक राजेंद्र कदम यांनी सूत्रसंचालन तर हिरामण राठोड यांनी आभार मानले.