दिंडोरी : शहरात कोरोना विष्णू संसर्ग आटोक्यात राहावा, त्याचा फैलाव होऊ नये म्हणून नगर पंचायत प्रशासन शहरात वारंवार मास्क वापरावा, सोशिअल डिस्टन्स पाळावे यासाठी सातत्याने प्रबोधन केले जात आहे.
घंटागाडीच्या माध्यमातून लाऊडस्पीकरद्वारे नागरिकांना खबरदारीच्या उपाययोजना व सूचना देत आहे. तरीही शहरात कोरोनाबाबत काही नागरिक बेफिकिरी दाखवत आहे. म्हणून नगर पंचायत प्रशासनाने महसूल प्रशासन व पोलीस प्रशासन याचे बरोबर संयुक्तिक कार्यवाही करून भरारी पथक नेमत दंडात्मक कारवाई केली असून सोमवारी नऊ हजार दंड वसुली केली आहे. शनिवारी व रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बाजारपेठ बंद ठेवण्यात येत असून सायंकाळी सातनंतर बाजारपेठ बंद करण्यात येत आहे. नियम न पाळणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाई करण्यात येत आहे. मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करत प्रबोधन करण्यात येत आहे. नगर पंचायत मुख्याधिकारी नागेश येवले यांच्या नेतृत्वाखाली पथक बाजारपेठेत फिरत नागरिकांचे प्रबोधन करत आहे.
प्रांताधिकारी संदीप आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार पंकज पवार, नगर पंचायतीचे मुख्याधिकारी नागेश येवले, पोलीस निरीक्षक अनिलकुमार बोरसे, पोलीस उपनिरीक्षक कल्पेशकुमार चव्हाण, प्रशासकीय अधिकारी प्रशांत पोतदार, कर निरीक्षक प्रदीप मावलक यांनी शहरात धडक मोहीम राबविली. (२३ दिंडोरी १)