-----
संचित रजेवर आलेला आरोपी फरार
मालेगाव : १५ डिसेंबर, २०२० पासून संचित रजेवर मुक्त करण्यात आलेला आरोपी इम्रान अहमद अनिस अहमद अन्सारी (२४) रा. घर नं. ६८, कुसुंबारोड, सलीमनगर, ग. नं. २ हा फरार झाला. या प्रकरणी नाशिक मध्यवर्ती कारागृहातील पोलीस शिपाई इम्रान हमीद सय्यद यांनी शहर पोलिसात फिर्याद दिली. आरोपी इम्रान अहमद हा १५ डिसेंबरपासून संचित रजेवर होता. ६ जानेवारी रोजी नाशिक रोड कारागृहात हजर होणे आवश्यक होते, परंतु कारागृहात हजर न होता फरार झाल्याने, त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास उपनिरीक्षक सुनील आहेर करीत आहेत.
----
मुंगसे शिवारात अपघात, चालकाविरोधात गुन्हा
मालेगाव : तालुक्यातील पाटणे फाटा येथे मुंगसे शिवारात २७ डिसेंबर रोजी भरधाव वेगात जाणाऱ्या कारने समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन जण जखमी झाले. याप्रकरणी तालुका पोलिसात महेश लालचंद सावंत रा. आघार बुद्रुक यांनी फिर्याद दिली. पोलिसांनी हुंदाई क्रीएटा कार क्रमांक युपी ८३ बीए ८३२७ वरील चालकाविरोधात गुन्हा दाखल केला. मुंबई-आग्रा महामार्गावर भरधाव वेगात हुंदाई कार चालवून समोरून येणाऱ्या दुचाकी क्रमांक एमएच ४१ झेड २९७३ ला धडक दिली. यात फिर्यादी व साक्षीदार जखमी झाले. अधिक तपास जमादार खैरनार करीत आहेत.
----
झोडगे-राजमाने रस्त्यावर रिक्षात चोरी
मालेगाव : तालुक्यातील झोडगे-राजमाने रस्त्यावर रिक्षामध्ये प्रवास करताना रिक्षाचालक व दोन अज्ञात महिलांनी सुमारे १ लाख ३८ हजारांचा ऐवज हात चलाखीने चोरून नेला. या प्रकरणी छायाबाई बापू मुसळे (५०) रा. वाखारकरनगर, नाटेश्वर कॉलनी, प्लॉट नं. ४५ ए, धुळे यांनी तालुका पोलिसात फिर्याद दिली. पोलिसांनी दोन अनोळखी महिलांसह रिक्षाचालकाविरोधात गुन्हा दाखल केला. गेल्या मंगळवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. फिर्यादी छायाबाई मुसळे या अनोळखी रिक्षामध्ये प्रवास करीत असताना, अज्ञात रिक्षाचालक व रिक्षात बसलेल्या दोन महिलांनी फिर्यादीच्या गळ्यातील पर्समध्ये ठेवलेले ७५ हजार रुपये किमतीचा ५ तोळे वजनाचा सोन्याचा चपला हार, ६३ हजार रुपये किमतीची सोन्याची मंगल पोत असे १ लाख ३८ हजार रुपयांचे दागिने लबाडीच्या इराद्याने चोरून नेले. अधिक तपास जमादार राजपूत करीत आहेत.
----
निशातनगरातून दुचाकीची चोरी
मालेगाव : शहरातील निशातनगरात गट नं. १, प्लॉट नं. ५१६ येथे लावलेली २५ हजार रुपये किमतीची दुचाकी क्रमांक एमएच ४१ एएल ३०६४ अज्ञात चोरट्याने चोरून नेली. गेल्या मंगळवारी रात्री १० ते बुधवारी सकाळी १० वाजेदरम्यान ही चोरी झाली. रजाअली मोहंमद हमजा रा. निशातनगर यांनी आयेशानगर पोलिसात फिर्याद दिली. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक पवार करीत आहेत.
-----