नांदूरवैद्य : कोरोनामुळे अनेक धार्मिक कार्यक्रमांसह विवाह सोहळे स्थगित झाल्याने वधू-वर पित्यांमध्ये चिंंता व्यक्त केली जात आहे. त्यातच अनेकांनी घराच्या दारात मांडव टाकत मोजक्या लोकांच्या उपस्थितीत लग्नविधी पार पाडले आहेत तर अनेकांना कार्यालय बुकिंगचे रिफंड मिळूनही टेन्शन कायम असल्याचे दिसून येत आहे.कोरोनासारख्या जीवघेण्या विषाणूच्या वाढत्या फैलावामुळे राज्यातील विविध शहरी भागात हातपाय पसरायला सुरुवात केल्यानंतर आता आपला मोर्चा ग्रामीण भागाकडे वळविला आहे. ग्रामीण भागातील यात्रोत्सव, सभारंभ पुढे ढकलण्यात आले आहेत. तसेच आता केंद्र शासनाच्या १४ एप्रिलपर्यंतच्या लॉकडाउनमुळे विवाह सोहळ्यांसह उर्वरित मोठे सोहळेही स्थगित करण्यात आलेले आहेत, त्यामुळे कधी हे विघ्न जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.लग्नसोहळ्यांचा थाट विशेषत: ग्रामीण भागात अधिक असतो. फेब्रुवारी, मार्चपासून सुरू होणारे लग्न सोहळे अगदी जून व जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सुरू राहतात. इगतपुरी तालुक्यासह नाशिक जिल्ह्यातील शेकडो वर-वधूंचे लग्न ठरले आहे, मात्र कोरोनामुळे हे लग्नसोहळे पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यांनी मनमानी केली, त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे इकडे आड तिकडे विहीर असे ग्रामीण भागातील चित्र आहे.दरम्यान, या लग्नसोहळ्यामुळे केटरर्सकडे कामाला आलेले आचारी, कामगार, वाढपी, डेकोरेशनवाले, वाजंत्री, बॅँडवाले, कार्यालय चालक, मंडपवाले व त्यांचे कामगार यांचे रोजगार बुडाल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. तर काही वधू- वरांची लग्न तारीख ठरली असूनही, लग्न मात्र करता येत नसल्यामुळे वधू पित्याची चिंंता वाढवणारी ठरत असल्याचे चित्र सध्या सर्वत्र दिसून येत आहे.अनेक वधू पित्यांनी लॉकडाउन होण्याअगोदरच अगदी साधेपणाने लग्न उरकण्यावर भर दिला होता. अशा लग्न सोहळ्यांसाठी अत्यंत कमी लोक जमा झाल्याने मंगल कार्यालय, मंडप, डेकोरेशन, बॅँड आणि जेवणावळींचा फार मोठा खर्च वाचला आहे. लग्नसोहळे अत्यंत साधेपणाने दारासमोरच किंवा गावातील मंदिरात उरकण्यात आले. त्यामुळे ज्या वधू पक्ष किंंवा वर पक्षाकडे लग्नसोहळा पार पाडण्याचे ठरले होते ते त्यांच्या लग्नाचा होणारा अनाठायी खर्च वाचला आहे. त्यामुळे कही खुशी, कही गम व्यक्त करण्यात येत आहे.
विवाह सोहळ्यांना फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2020 11:48 PM
कोरोनामुळे अनेक धार्मिक कार्यक्रमांसह विवाह सोहळे स्थगित झाल्याने वधू-वर पित्यांमध्ये चिंंता व्यक्त केली जात आहे. त्यातच अनेकांनी घराच्या दारात मांडव टाकत मोजक्या लोकांच्या उपस्थितीत लग्नविधी पार पाडले आहेत तर अनेकांना कार्यालय बुकिंगचे रिफंड मिळूनही टेन्शन कायम असल्याचे दिसून येत आहे.
ठळक मुद्देवधू-वर पित्यांमध्ये चिंता : रिफंड मिळूनही टेन्शन कायम