नाशिक : जिल्ह्यात गत दशकापर्यंत १०० एड्सबाधित महिलांद्वारे त्यांच्या बालकांना होणाऱ्या एड्सची संख्या सहा ते आठ इतकी होती. मात्र, गत तीन वर्षांपासून या प्रमाणात सातत्याने मोठी घट आली असून, आता हे प्रमाण १०० बाधित महिलांमागे केवळ एक ते दोन बालके बाधित होण्यापर्यंत सीमित झाले आहे. सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये मोफत असलेली एचआयव्हीची चाचणी, सर्व गर्भवती महिलांनी करून घेतल्यास निदान त्यांच्यापासून बालकांना होऊ शकणारा एचआयव्ही बहुतांश प्रसंगी टाळता येणे शक्य झाले असल्याचेच नाशिकच्या जिल्हा रुग्णालयातील आकडेवारीतून दिसून येत आहे.
नाशिक जिल्ह्यात २००७ सालापासून एड्स नियंत्रण पथकांतर्गत शासकीय योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी केली जात आहे. तेव्हापासूनच या विभागाकडून एड्सप्रसार गर्भवती मातांकडून मुलांना होऊ नये, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र, गत दशकातील त्यावेळच्या तंत्रज्ञानानुसार १०० महिलांमागे किमान सहा तेे आठ बालकांना एड्सबाधा झाल्याचे आढळून येत होते. त्यापूर्वी तर हे प्रमाण १० ते ३० टक्के इतके अधिक होते. परंतु, या दशकाच्या उत्तरार्धात सुरू झालेल्या एआरटी ट्रीटमेंटच्या पर्यायामुळे मातेकडून मुलांना होणाऱ्या एचआयव्ही बाधेचे प्रमाण २५ टक्क्यांवर आले आहे. २०१७ साली ८६ एचआयव्हीबाधित गर्भवती महिलांच्या मुलांपैकी केवळ दोघांना, २०१८ साली ६९ गर्भवती महिलांच्या मुलांपैकी केवळ एकाला, २०१९ साली ५० एचआयव्हीबाधित महिलांपैकी एकमेव अर्भकाला, तर २०२० वर्षी झालेल्या ६८ महिलांच्या चाचण्यांपैकी केवळ एकमेव बालकाला एचआयव्हीबाधा झाल्याचे आढळून आले आहे. जिल्ह्यात गत दोन दशकांत सुमारे ३५० मुलांना जन्मत:च एड्सबाधा झाल्याचे आढळून आले आहे. मात्र, आता हे प्रमाण कमी होत असल्याने विविध कारणांमुळे एड्सबाधित झालेल्या महिलांच्या बालकांना तरी दिलासा मिळू लागला आहे.
इन्फो---
न्यूक्लिअर सीडटेस्टची अद्याप प्रतीक्षाच
एड्स चाचणीसाठीचे अधिक प्रगत तंत्रज्ञान म्हणून जगभरात न्यूक्लिअर सीडटेस्ट तंत्रज्ञानाला गौरविले जाते. त्यामुळेच हे तंत्रज्ञान राज्यामध्ये मुंबईत तीन ठिकाणी, तर पुणे, औरंगाबाद, अमरावती, नागपूर, नाशिक येथे अनुक्रमे एक अशी आठ न्यूक्लिअर सीडटेस्ट केंद्र उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यासाठीचा १८ कोटी १२ लाख रुपयांचा प्रस्ताव राज्यस्तरावरूनच प्रलंबित असल्याने अद्यापही नाशिकसह राज्यभरातील न्यूक्लिअर सीडटेस्ट केंद्र उभारणे शक्य झालेले नाही.
कोट---
गर्भवती महिलांना जिल्ह्यातील सर्व केंद्रांवर मोफत एचआयव्ही तपासणी करण्याची सुविधा उपलब्ध आहे. सर्व गर्भवतींनी त्यांच्या एचआयव्ही चाचण्या करून घेतल्यास यदाकदाचित त्या कोणत्याही कारणामुळे बाधित असल्या, तरी त्यांच्या होणाऱ्या बालकांना एचआयव्ही टाळणे शक्य आहे. त्यामुळे प्रत्येक गर्भवती महिलेने आणि तिच्या कुटुंबीयांनी या चाचणीबाबत आग्रही राहण्याची गरज आहे.
योगेश परदेशी, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, एड्स नियंत्रण पथक, जिल्हा रुग्णालय