मालेगाव मध्य : नागरिकत्व सुधारित कायदा रद्द करून प्रस्तावित राष्टÑीय नागरिक नोंदणी कायद्यातील जाचक अटी शिथिल कराव्यात या मागणीसाठी बहुजन समाज पार्टीने शुक्रवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ धरणे आंदोलन छेडले होते. यावेळी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.एनआरसी कायद्यामुळे देशाचे मूळनिवासी असलेल्या दलित, आदिवासी, ओबीसी व अल्पसंख्याक समुदायांना त्रास सोसावा लागणार आहे हे आसाममध्ये सिद्ध झाले आहे. हा कायदाच राजकीय हेतूने प्रेिरत असून, भारतीय राज्य घटनेच्या कलम १४ व १५ चे उल्लंघन करणारा आहे. शुक्रवारी दुपारी ३ वाजता आंदोलनाला सुरुवात झाली. पोलिसांनी जेलभरो आंदोलनाला परवानगी नाकारल्यामुळे आंदोलकर्त्यांनी जेलभरोचे फलक हातात घेत धरणे दिले. या आंदोलनात बहुजन समाज पार्टीचे जिल्हा प्रभारी रमेश निकम, आनंद आढाव, रमेश जगताप, समाजवादी पार्टीचे शहराध्यक्ष जैनुद्दीन मन्सुरी, सुफी गुलाम रसुल, जमात इस्लामीकचे मौलाना फिरोज आझमी यांचे भाषण झाले. धरणे आंदोलनात गौतम अहिरे, संतोष शिंदे, राजू जाधव, सुनील पवार, अब्दुल अजिम फवाही, अजहर खान, सोहेल अहमद, रशीद खान आदींसह कार्यकर्ते, धार्मिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.
एनआरसी विरोधात बहुजन समाज पार्टीचे धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2020 10:36 PM