नाशिक : भारतीय कालगणनेतील फाल्गुन महिन्याच्या अखेरीस येणाऱ्या होळीवरही यंदा कोरोनामुळे निर्बंध आल्याने होळीसारखा महत्वाचा सणदेखील घरातच किंवा घराच्या अंगणात पार पाडावा लागणार आहे. त्यामुळे बाजारात गोवऱ्या, कापुर, पूजा साहित्य दाखल झाले असले तरी त्याला फारसा उठाव नाही. त्यामुळे यंदा होळीच्या सणाला कोरोनाच्या नावेच बोंब मारण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.
गत महिन्यापर्यंत कोरोनाचे प्रमाण कमी होऊ लागल्याने मार्च महिन्यातील होळी, रंगपंचमीचे सण उत्साहात साजरे करता येतील, अशी आशा नागरिकांना वाटू लागली होती. मात्र, मार्चच्या प्रारंभापासून कोरोनाने प्रचंड वेग पकडल्याने सर्व बालगोपाल, तरुणाईच्या इच्छा, आकांक्षांवर पाणी पडले आहे. नाशकात सर्वात मोठी होळी यशवंत महाराज पटांगणावर तसेच गोपाळ मंगल कार्यालयाजवळ सरदार चौकात, शनी मंदिर चौक , नेहरू चौक, रविवार कारंजा, घनकर गल्ली आणि पंचवटीतील नागचौकात होळी उत्सव साजरा केला जातो. त्याशिवाय जुने नाशिक आणि पंचवटीतील गल्ल्यांमध्ये पारंपरीक पद्धतीने होळी पेटवून पुरणपोळीचा नैवेद्य दाखविण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी असते. होळीच्या दिवशी समिधा म्हणून काही लाकडे,गोवऱ्या, वाळलेले गवतदेखील होळीत टाकून नारळदेखील अर्पण करण्याची परंपरा आहे. तसेच पेटलेल्या होळीभोवती प्रदक्षिणा घातल्यानंतर बोंब ठोकण्याची परंपरादेखील आहे. मात्र, यंदाच्या वर्षी शासनाने घातलेल्या निर्बंधामुळे सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या होळ्या करता येणार नाहीत. त्याऐवजी घरासमोर, सोसायटीतील मोकळ्या जागेत प्रातिनिधीक स्वरुपात दोन-चार गोवऱ्या रचून होळी साजरी करण्याची मुभा देण्यात आली आहे. नाशकात होळीनंतर पाचव्या दिवशी म्हणजेच रंगपंचमीलाच रंग खेळले जाण्याची परंपरा आहे. मात्र, यंदा त्यावरदेखील निर्बंध असल्याने रहाडी किंवा सार्वजनिक रंगपंचमीदेखील साजरी करता येणार नसल्याने बालगोपाल आणि तरुणाईच्या आनंदावर विरजण पडले आहे.