लोकमत न्यूज नेटवर्कयेवला : शासन आणि बँका मिळून शेतकऱ्यांना कर्जवसुलीसाठी जप्तीपूर्व नोटिसा, मालमत्ता लिलावाबाबत नोटिसा देऊन शेतकऱ्याला धाकदपटशा करण्याचे काम चालू आहे. याचा निषेध म्हणून शेतकरी संघटनेतर्फे गुरुवारी (दि. ११) शहरातील विंचूर चौफुली येथे बँक नोटिसांची होळी करण्यात आली. यावेळी नायब तहसीलदार सविता पठारे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी रास्ता रोकोसारखी परिस्थिती निर्माण झाली होती. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.गेली तीन वर्षे दुष्काळ, नापिकी, गारपिटीचा फटका बसल्याने शेतकरी अडचणीत सापडला. यावर्षी चांगला पाऊस झाल्याने शेतमालाचे भरमसाठ उत्पादन झाले. आतापर्यंत सर्व सरकारांनी शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळायला लागला की झोनबंदी, निर्यातबंदी, कोटा, जीवनावश्यक कायदा यासारख्याचा आवलंब करून शेतकऱ्यांचे अब्जावधी रुपयांचे नुकसान केले. त्याची भरपाई म्हणून शासनाने बँकेला पैसे देऊन शेतकऱ्याला कर्जमुक्त करावे, अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या.या जिल्हा बँक नोटीस होळी आंदोलनप्रसंगी शेतकरी संघटनेचे नेते संतु पा. झांबरे, संध्या पगारे, बाळासाहेब गायकवाड, बाळनाथ गाडे, अरुण जाधव, सुरेश जेजूरकर, सुभाष सोनवणे, आनंदा महाले, देवचंद उधडे, कारभारी जगझाप, जाफर पठाण, बाबासाहेब पाटील, राजेंद्र कावळे, अनिस पटेल, बाबूराव गांगुर्डे, प्रभाकर भोसले, शिवाजी वाघ, बापूसाहेब पगारे, दत्तात्रय भोरकडे, भानुदास चव्हाण, तुळशिराम जाधव, हरिदास पवार आदींसह शेतकरी उपस्थित होते.
बॅँकेच्या नोटिसांची होळी
By admin | Published: May 12, 2017 1:23 AM