अमोल तुपे
देवगाव (नाशिक) : देशांतर्गत बाजारपेठेतील कांद्याच्या वाढत्या किमतींना लगाम घालण्यासाठी केंद्राने शनिवारी कांद्याच्या निर्यातीवर ३१ डिसेंबरपर्यंत ४० टक्के शुल्क आकारणी करण्याच्या निर्णयाचा अध्यादेश जारी केला. त्यामुळे कांद्याच्या भावावर परिणाम होणार असल्याने देवगाव येथील शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या या निर्णयाच्या अध्यादेशाची होळी केली. यंदा पावसाने ओढ दिल्याने आधीच शेतकरी अडचणीत आले आहेत. साधारण सप्टेंबर महिन्यात कांद्याचे भाव वाढण्याची शक्यता गृहीत धरून शासनाने कांदा निर्यातीवरील ४० टक्के निर्यात शुल्क लागू करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या अडचणीत येणार आहे. आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना जगविण्यासाठी केंद्र सरकारने लागू केलेल्या कांदा निर्यातीवरील ४० टक्के शुल्क आकारणीचा निर्णय तत्काळ रद्द करावा, अशी मागणी माजी पंचायत समिती सदस्य भाऊसाहेब बोचरे यांनी केली. याप्रसंगी शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या या निर्णयाविरोधात घोषणाबाजी करून निषेध केला.
यावेळी माजी पंचायत समिती सदस्य भाऊसाहेब बोचरे, माजी सरपंच विनोद जोशी, देवगाव सोसायटीचे संचालक दिगंबर सोमवंशी, धनंजय जोशी, मनोहर बोचरे, सचिन बोचरे, गोरख निलख, श्यामराव लोहारकर, अण्णा उफाडे, ज्ञानेश्वर साबळे, जगन बोचरे, वैभव जोशी, अनिल खुळे, योगेश बोचरे, संतोष साबळे, पांडुरंग कूलथे, सुरेश राजगुरू, बबन पिंगट, प्रकाश लोहारकर, गणपत बोचरे, संजय मेमाणे, प्रभाकर घाडगे आदींसह शेतकरी उपस्थित होते.