वणी : सुरगाणा व पेठ तालुक्यातील शेतमजुर होळी उत्सव साजरा करण्यासाठी मुळ गावी गेल्याने दिंडोरी तालुक्यातील शेतीकामांचा वेग मंदावला आहे. दिंडोरी तालुक्यात प्रामुख्याने सुरगाणा व पेठ तालुक्यातील आदिवासी बांधव शेतमजुरीसाठी येतात. बहुतांशी आदिवासी बांधवांचे कुटुंबिय या कामासाठी महिना न महिना शेतमालकांकड़े वास्तव्य करतात. मजुरी करून उदरनिर्वाह करणे तसेच चार पैसे गाठीला बांधून संसाराचा गाड़ा हाकण्याकड़े त्यांचा अग्रक्र म असतो. शेतीकामाचे ज्ञान व कष्ट करण्याच्या तयारीमुळे त्या भागातील मजुरांना विशेष मागणी असते. होळी उत्सवाची लगबग जेव्हा सुरू होते तेव्हा त्या मजुरांना वेध लागतात ते मुळ गावी परतण्याचे. आदिवासी बांधवांमध्ये होळीचे अनन्यसाधारण महत्व आहे. पिढ्यानिपढया कुटुंबियासमवेत हा सण साजरा करण्याची परंपरा आहे. तसेच होळीपासुन सुरगाणा व पेठ तालुक्यात मोठ्या प्रमाणावर यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात येते. आदिवासी बांध हा सण मुक्तमनाने साजरा करतात. पूजाविधी नैवेद्य, गोड धोड़ पदार्थ आवर्जुन तयार केले जातात. नविन कपड़े भ्रमणध्वनी , पादत्राणे, गॉगल्स खरेदी करण्याकड़े कल असतो. दरम्यान हे सर्व करण्यासाठी अनेक दिवसांपासुन तयारी करणारा आदिवासी शेतमजुर आवर्जुन मुळगावी जाण्याकरिता उत्सुक असतो. अशावेळी शेतमालक आदिवासींच्या भावना समजुन परवानगी देतात व सण साजरा करण्यासाठी पैसेही देतात. होळी मोकळेपणाने साजरा करण्यासाठी आदिवासी बांधव मुळगावी परतल्याने या नमुद सर्व घटकांच्या कामकाजाचा वेग मंदावला आहे. दरम्यान बिहार उत्तर प्रदेश या भागातील बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या घटकांनीही होळी सण साजरा करण्यासाठी आपल्या गावाची वाट धरली आहे. या भागातून दिंडोरी तालुक्यात उदरनिर्वाहासाठी हजारोंच्या संख्येने परप्रांतीय वास्तव्यास आहेत.
सुरगाणा, पेठ तालुक्यातील शेतमजूरांना होळीचे वेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 1:25 PM