सटाणा : शहरातील ६० फुटी रोडलगतच्या राजमाता जिजाऊ नगरमध्ये घरी कोणीही नसल्याचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून घरातील सोन्याच्या वस्तू व दोन लाख पन्नास हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली आहे. सटाणा पोलिसांत अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. ६० फुटी रोडलगतच्या राजमाता जिजाऊ चौकातील काळू नानाजी नगरमधील राहत असलेले भरत रामलाल परदेशी कामानिमित्त देवळा तालुक्यातील लोहणेर येथे गेले असता घरी कोणी नसल्याचा फायदा घेऊन चोरट्यांनी चोरी केली असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. बुधवारी भरत परदेशी परिवाराला घेऊन लोहणेर येथे गेले असताना रात्रीच्या अंधारात फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून कपाटात ठेवलेले तीन ग्रॅम सोन्याची अंगठी सात ग्रॅमचे मनीमंगळसूत्र, २ लाख २८ हजार रोख रक्कम असा २ लाख ७४ हजारांचा ऐवज लंपास केला आहे, तर बाजूच्या गल्लीत राहणारे इत्तेशाम शेख गुलाम अहमंद शेख यांच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून अज्ञात चोरट्यांनी २२ हजार रोख रक्कम लंपास केल्याची घटना घडली आहे. भरत परदेशी यांनी सटाणा पोलिसांत फिर्याद दिली असून, पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक वर्षा जाधव तपास करीत आहेत. सटाणा शहरात चोऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढू लागले आहे. काळू नानाजी नगर व परिसरात भुरट्या चोऱ्याही वाढू लागल्या आहेत. काळू नानाजी नगर व परिसर येथे दाट वस्ती आहे. पोलिसांनी गस्त वाढवावी व अज्ञात चोरट्यांचा लवकरात लवकर शोध घ्यावा, अशी मागणी होत आहे.
सटाण्यात घरफोडी, अडीच लाखांचा ऐवज लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2021 4:38 PM