ग्रामीण भागातील रुग्णांचे हाल
नाशिक: जिल्ह्यातील ग्रामीण भागात रुग्णसंख्या वाढत असल्याने अशा रुग्णांचे आणि त्यांच्या नातेवाइकांचे रुग्णालयाअभावी हाल होत आहेत. रुग्णांना घेऊन शहरात यावे लागत असल्याने रुग्णांसह नातेवाइकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
उपनगर लसीकरण केंद्रावर गर्दी
नाशिक: उपनगर येथील लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची गर्दी होऊ लागली आहे. मागील आठवड्यात लस नसल्याने ज्येष्ठांना लसीची प्रतीक्षा होती. परंतु, आता पहिला डोसही मिळत नसल्याने ज्येष्ठांसह ४५ वर्षांवरील नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे.
शेतकऱ्यांना कृषी कर्जाची प्रतीक्षा
नाशिक: आगामी हंगामासाठी शेतकऱ्यांना अनेक अडचणी निर्माण होण्याची शक्यता असल्याने त्यांना कृषी कर्ज देण्यात यावे, अशी मागणी होऊ लागली आहे. लॉकडाऊनमुळे मागील वर्षापासून शेतकरी अडचणीत सापडला आहे. कर्ज भरूनही त्यांना नवीन कर्ज मिळत नसल्याने निदान पुढील हंगामासाठी तरी कर्ज मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
बिटको रुग्णालयात स्थानिकांना मिळेना बेड
नाशिक : नाशिक रोड येथील बिटको रुग्णालयात जिल्ह्यातील अन्य रुग्णांना बेड मिळत असून, स्थानिकांना मात्र बेड उपलब्ध होत नसल्याची तक्रार होत आहे. रुग्णालयात बेड मिळवून देण्यासाठी स्थानिक कार्यकर्त्यांकडून दिशाभूल केली जात असल्याची देखील चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे.