----------------------
लसीकरणाचा वेग वाढविण्याची मागणी
सिन्नर: तालुक्यात १० ठिकाणी कोरोना लसीकरण करण्यात येत असले तरी लसीकरणाचा वेग वाढविण्याची गरज व्यक्त केली जात आहे. मागणीपेक्षा लसीचा पुरवठा कमी असल्याने यंत्रणेवर काही प्रमाणात ताण येत आहे. सिन्नर शहरासह ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढू लागली आहे. प्रशासन या आपत्तीचा सामना करीत असले तरी नागरिकांनीही सहकार्य करण्याची गरज आहे. यंत्रणेत योग्य समन्वय राखून लसीकरणाचा वेग वाढविण्याची गरज आहे.
----------------------
हातावर पोट असणारे कडक निर्बंधामुळे अडचणीत
सिन्नर: गेल्या वर्षापासून कोरोनामुळे अनेक व्यवहार थंडावले आहेत. अशात हातावर पोट असणारे नागरिक कडक निर्बंधामुळे आर्थिक अडचणीत सापडल्याचे दिसते. जीवनावश्यक सेवा वगळता अन्य दुकाने बंद आहेत. अशा दुकानात काम करणारे, बांधकाम मजूर, हॉटेलमधील कामगार, लग्नमंडपवाल्यांकडे काम करणारे आदींसह अनेकांचे पोट हातावर आहे. असे अनेकजण आर्थिक संकटात सापडले आहेत.
-------------------------
पाडळी, आशापूर येथे लसीकरण
सिन्नर: तालुक्यातील पाडळी येथील पाताळेश्वर माध्यमिक विद्यालय, पाडळी व आशापूर ग्रामपंचायत यांच्या पुढाकारातून लसीकरण मोहीम राबविण्यात आली. आशापूर, हिवरे, तामकडवाडी, टोळे वस्ती, लिंबाची वाडी, बोगीरवाडी, ठाकरवाडी येथील पात्र ४५ वर्षांपुढील नागरिकांना आरोग्य विभागाच्या वतीने लसीकरण करण्यात आले. डॉ. आर. डी. धादवड, डॉ. सतीश केदार, आरोग्यसेविका सुरेखा गिरी, रोहिणी रुपवते, लता रुपवते, मीना सहाणे यांनी १३० ग्रामस्थांचे लसीकरण केले.
-----------------
सिन्नरला हनुमान जयंती साधेपणाने
सिन्नर: शहरासह ग्रामीण भागात रामभक्त हनुमान जयंती अतिशय साधेपणाने पण भक्तिभावाने साजरी करण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिरे बंद करण्यात आली आहे. तथापि, पहाटे पुजारी व मोजक्या दोन-चार भाविकांच्या उपस्थितीत हनुमानरायास अभिषेक घालून पूजा अर्चा व महाआरती करण्यात आली. गावोगावी मंदिरांमध्ये दरवर्षी महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते. मात्र यावर्षी पुजारी व मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत केवळ पूजा, अभिषेक व आरती करण्यात आली.