नाशिक : शहरातील वाढती गुन्हेगारी विशेषत: हत्या आणि प्राणघातक हल्ल्यांमुळे नागरीकांमध्ये भितीचे वातावरण आहे. त्यातच गुरूवारी (दि.२५) सिडकोत एका युवकाची भर दिवसा हत्या झाली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नाशिककर हादरले आहेत. विशेेष म्हणजे गेल्या महिन्यात विधी मंडळाच्या अधिवेशनाच्या दरम्यान, नाशिक शहरातील भाजपाच्या तीन्ही आमदारांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली, त्यावेळी त्यांनी पंधरा दिवसात नाशिकमध्ये कायदा सुव्यवस्थेत बदल दिसेल असे सांगितले हेाते.
त्याला महिना उलटला आहे. मात्र, गेल्या पंधरा दिवसात केवळ सिडको याच भागात चार जणांंची हत्या झाल्या आहेत. नाशिक मध्ये गेल्या वर्षभरापासून टोळी युध्दाने डोके वर काढले असून गल्ली बोळातील भाई तसेच अल्पवयीन मुलांच्या समावेशाने गुन्हेगारी वाढली आहे. मुंबईत अधिवेशन सुरू असताना नाशिकमध्ये हत्या प्रकरण सुरूच असल्याने भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे आणि ॲड. राहुल ढिकले यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी पंधरा दिवसांत नाशिकच्या कायदा आणि सुव्यवस्थेत अनुकूल बदल झालेला दिसेल असे सांगितले होते. मात्र, पोलीसांनी नागरीकांच्या बैठका घेण्यापलिकडे सराईत गुंडांची दादागिरी कमी झालेली नाही तर गेल्या पंधरा दिवसांत सिडकोत चार खून झाले आहेत.
अंबड पोलीस ठाणे म्हणजे सिडको विभागात १० ऑगस्ट रोजी मिराज खान आणि इब्राहिम खान या दोघांचे खून झाले. त्यानंतर १७ ऑगस्टला मयूर दातीर या युवकाचा अंबड येथे खून झाला तर गुरूवारी (दि.२४) संदीप आठवले या युवकाचा खून झाला आहे.