लोकमत न्यूज नेटवर्क.
देशमाने : दोन ते तीन महिने चालणारे टोमॅटोचे पीक यंदा शेतकऱ्यांना कवडीमोल दरामुळे अवघ्या २० ते २५ दिवसांत सोडण्याची नामुष्की शेतकऱ्यांवर ओढवली असून, सध्या टोमॅटोला मिळणाऱ्या दरातून साधा उत्पादन खर्च देखील फिटत नसल्याने शेतकऱ्यांवर कर्जबाजारी होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
येवला तालुक्यात शेतकरी कांद्याबरोबर टोमॅटोचे देखील विक्रमी उत्पादन घेतात. यंदा देखील चांगल्या प्रकारे भाव मिळेल या आशेने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात टोमॅटोचे उत्पादन घेतले. सध्या टोमॅटोला मिळत असलेल्या कवडीमोल दरामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले असून मिळणाऱ्या भावातून टोमॅटो पिकाला केलेला खर्च फिटणे देखील शेतकऱ्यांना दुरापास्त झाले आहे. कवडीमोल मिळणाऱ्या दरामुळे अनेक शेतकरी आपला टोमॅटो रस्त्यावर टाकून देत आपला रोष व्यक्त करत आहेत, तर अनेक शेतकऱ्यांनी टोमॅटोचे पीक तसेच सोडून दिले असून काही ठिकाणी टोमॅटो झाडावर कुऱ्हाड देखील चालविली आहे.
मात्र यावर्षी टोमॅटो पिकाला मिळत असलेला दर बघून बळीराजाच्या आर्थिक संकटात चांगली मोठी भर पडताना दिसून येत आहे. टोमॅटो लागवडीसाठी केलेला खर्च निघणे देखील कठीण झाले असून कवडीमोल दराने टोमॅटो विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. दरवर्षी टोमॅटोला प्रति कॅरेट सरासरी ५०० रुपयांच्या दरम्यान दर मिळत असतो. मात्र गेल्या काही दिवसांपासून बाजार समित्यात १ क्रेट टोमॅटोला २० ते ५० रुपयांपासून भाव बघायला मिळत आहे.
चौकट...
टोमॅटो पिकाच्या लागवडीसाठी प्रतिएकर अंदाजे जवळपास दीड लाख रुपये इतका खर्च येत असतो. यात नांगरणी २२०० रुपये, रोटरी मारण्यासाठी २२०० रुपये, सऱ्या पाडण्यासाठी १००० रुपये इतका दर शेतकऱ्यांना मोजावा लागतो. त्यात मल्चिंग पेपर टाकण्यासाठी ५००० रुपये, रोपांचा खर्च २० हजार रुपये, लागवडीसाठी खर्च ५००० रुपये, औषधांचा खर्च अंदाजे ७० हजार रुपये, टोमॅटो बांधणीसाठी बांबू व सुतळी याचाही इतर खर्च येत असतो.
चौकट...
लिलाव न करताच माघारी....
मागील काही दिवसांपासून शेतकरी वर्गाने विक्रीसाठी नेलेला टोमॅटो व्यापारी वर्गाकडून खरेदी केला जात नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात असून बाजार समित्यात विक्रीसाठी नेलेल्या टोमॅटोला लिलावाची बोली न लागल्याने रस्त्यावर टोमॅटो ओतून शेतकरी आपला रोष व्यक्त करत आहेत.
चौकट...
जनावरांना खायला टोमॅटो....
सध्या मिळणाऱ्या टोमॅटोच्या दरातून उत्पादन खर्च फिटणे अवघड झाल्याने अनेक ठिकाणी टोमॅटो जनावरांना चारा म्हणून खाऊ घातला जात असल्याचे दिसून आले आहे. तसेच अनेक शेतकरी टाकून देण्याच्या उद्देशाने काढलेले टोमॅटो दुसरे शेतकरी लहान ट्रॉली भरून आपल्या जनावरांना चारा म्हणून घेऊन जात असल्याचे दिसून आले आहे.
इन्फो...
यंदा टोमॅटोला चांगल्या प्रकारे भाव मिळेल या आशेने टोमॅटो लावले होते. वातावरणातील सातत्याने बदलामुळे टोमॅटो पीक वाचविण्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च देखील केला होता; मात्र कवडीमोल भाव मिळत असल्याने साधा उत्पादन खर्च देखील फिटला नसून टोमॅटो तोडणीची मजुरी आणि गाडी भाडे खिशातून भरण्याची वेळ आली आहे.
- निखिल दुघड. शेतकरी, देशमाने.