सिन्नर: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 'शाळा बंद, पण शिक्षण सुरू' या उपक्रमांतर्गत तालुक्यातील दापूर येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक गोरक्ष सोनवणे यांनी आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांंचे अध्ययन सुकर होण्यासाठी गृहभेटीचा उपक्रम सुरु केला आहे. गृहभेटीची ही शाळा विद्यार्थ्यांना चांगलाच लळा लावत आहे.विद्यार्थ्यांना वैयक्तिक मार्गदर्शन व्हावे, या उद्देशाने सोनवणे हे आठवड्यातून किमान २ दिवस प्रत्यक्ष भेट घेऊन विद्यार्थ्यांच्या रोजच्या केलेल्या अभ्यासाचा फीडबॅक घेतात. तसेच वैयक्तिक मार्गदर्शन करून अडचणी सोडवतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना गृहभेटीतून शाळेचा लळा लागला असून विद्यार्थ्यांच्या अभ्यासात नियमितता दिसून येत आहे. दररोजचा अभ्यासही ते व्हाटस अॅपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना देत आहे. सोनवणे यांनी आपल्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना व्हाटस्अॅप ग्रुपला जोडले आहे त्यासाठी गल्लीमिञ,पालकमिञ ही संकल्पना यशस्वीपणे राबवली आहे. तसेच २ विद्यार्थ्यांना ' डोनेट अ डिव्हाईस' उपक्रमांतर्गत स्वत: मोबाईल डोनेट केले आहे. डोनेट अ बुक या उपक्रमातंर्गत १० विद्यार्थ्यांना गोष्टींची अवांतर पुस्तके उपलब्ध करून दिली आहे. याचबरोबर दरमहाच्या सर्व इयत्तेच्या कृतीपुस्तिका त्यांनी बनवल्या असून राज्यभरातील जवळपास १ लाख विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होत आहे. केवळ गृहभेटीवरच न थांबता सोनवणे हे गुगल मीटचा उपयोग करून पालकांशी व विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधतात. त्यामुळे त्यांच्या २ री च्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांची अध्ययन प्रकिया सुलभ झाली आहे. शासनाच्या सुरक्षिततेच्या सर्व निकषांचे पालन केले जात आहे. तसेच त्यांनी स्वत: तयार केलेल्या शैक्षणिक व्हिडिओंचा देखील विद्यार्थ्यांना विविध घटक सहज समजण्यासाठी उपयोग होत आहे. दापूर शाळेतील इतर शिक्षकांनीही गृहभेटीचा उपक्रम अवलंबला आहे.
दापूर शाळेतील शिक्षकाचा गृहभेटीचा उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2020 3:39 PM