लोकमत न्यूज नेटवर्कपंचवटी : आडगाव परिसरात राहणाऱ्या गोरगरीब नागरिकांना घरकुल योजनेच्या माध्यमातून घरकुल मिळवून देण्याच्या नावाखाली एका राजकीय पक्षाच्या जिल्हा पदाधिकाऱ्याने लाखो रुपये जमा करून नागरिकांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. घरकुल योजनेसाठी काही महिलांनी पैसे जमा करूनही घरकुल योजनेत घरकुल मिळत नसल्याचे लक्षात आल्यानंतर सदर महिलांनी गुरुवारी आडगाव पोलीस ठाण्यात तक्र ार देण्यासाठी धाव घेतली होती. याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, आडगाव तसेच शहरात शासनाकडून बांधल्या जाणाऱ्या घरकुल योजनेत घरे मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका राजकीय पक्षाच्या जिल्हा पदाधिकाऱ्याने आडगाव परिसरात राहणाऱ्या नागरिकांना भेटून घरकुल योजनेसाठी अर्ज करून देतो असे सांगून प्रत्येकी २०० ते ३०० रुपये जमा करून घेतले. त्यानंतर संबंधित महिलांनी त्या पदाधिकाऱ्याशी घरकुल कधी मिळणार याबाबत चौकशी केली असता संबंधित पदाधिकाऱ्याने टाळाटाळ केली. वारंवार संपर्क करूनही पैसे जमा करणाऱ्या त्या पदाधिकाऱ्याने पैसे परत देण्यास टाळाटाळ केल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात येताच आडगाव परिसरात राहणाऱ्या महिलांनी गुरुवारी दुपारी आडगाव पोलीस ठाण्यात तक्र ार दाखल करण्यासाठी धाव घेतली होती. दरम्यान, याबाबत दुपारपर्यंत कोणत्याही प्रकारचा गुन्हा आडगाव पोलीस ठाण्यात दाखल झाला नव्हता, असे पोलिसांनी सांगितले.जिल्हाधिकारी कार्यालयातून पंतप्रधान आवास योजनेचे अर्ज घेऊन प्रत्येकी अर्ज दोनशे रुपयांपेक्षा अधिक शुल्क घेऊन ग्रामीण भागातील महिलांना विक्री के ल्याप्रकरणी आडगाव पोलिसांनी नाशिक जिल्हा ग्रामिण कॉँग्रेस अनुसूचित जाती जमाती सेलच्या जिल्हाध्यक्ष पद घेऊन मिरविणाऱ्या शालिग्राम विठ्ठल बनसोडे व मंदाकिनी रावसाहेब गायकवाड या संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याविरुद्ध वंदना दिनकर खराटे (रा.दिंडोरी) यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संशयितांनी दिंडोरी, आडगाव, कळवण परिसरातील ग्रामीण महिलांना पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरकुलांचे आमिष दाखवून प्रत्येकी अर्ज दोनशे रुपयांपेक्षा अधिक किमतीमध्ये विक्री करून फसवणूक केल्याचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला आहे. याबाबत अधिक तपास पोलीस करीत आहेत.
घरकुलाच्या आमिषापोटी महिलांची फसवणूक?
By admin | Published: June 23, 2017 12:00 AM