नाशिक : गणेशोत्सव शहरात रंगात आला असताना भुरट्या चोरांचा उपद्रव वाढला आहे. नाशिकरोड, जुने नाशिक, सिडको, गंगापूररोड, सातपूर, गोविंदनगर या भागांमध्ये घरे, दुकाने चोरट्यांनी लक्ष्य करून सुमारे दहा लाखांचा ऐवज लंपास केल्याचे उघडकीस आले आहे. गणेशोत्सव काळात शहराची कायदा-सुव्यवस्था अबाधित राहवी, यासाठी पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला असला तरी शहरात भुरट्या चोऱ्यांसह घरफोड्यांसारख्या घटना वाढल्याने संताप व्यक्त होत आहे.गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात दागिने चोरी, पाकीटचोरी, घरफोड्या, दुचाकीचोरींसारख्या घटना घडण्याची भीती पोलीस आयुक्तालयाच्या शांतता समिती व गणेश मंडळांच्या संयुक्त बैठकीत व्यक्त करण्यात आली होती. यानुसार पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवत उपनगरांमध्येही गस्त वाढविण्याच्या सूचना आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी सर्व पोलीस ठाण्यांना दिल्या होत्या; मात्र चोरटे शहरात सक्रिय झाले असून, चार ते पाच घटनांमध्ये लाखोंचा ऐवज लंपास झाला आहे. चोरट्यांनी गंगापूररोडवरील शिवाजीनगर येथील भवर टॉवरमागील एक रो-हाउस फोडले. या घरफोडीत सुमारे चार लाखांचा मुद्देमाल चोरट्यांनी पळविला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, आनंदछाया रो-हाउसमधील लताबाई गोरख शिंदे (६०) यांच्या राहत्या घरातून गणेश चतुर्थीच्या दिवशी अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून प्रवेश केला. यामध्ये चोरट्यांनी १२ ग्रॅमचा सोन्याचा हार, दहा ग्रॅमची सोनसाखळी, १५ ग्रॅमची सोन्याची पोत, सात ग्रॅमचे मंगळसूत्र तीन लाख रुपयांच्या चांदीचे व सोन्याचे दागिने मिळून सुमारे तीन लाख ९६ हजारांचा मुद्देमाल लंपास केला. याप्रक रणी शिंदे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसºया घटनेत जुन्या नाशकातील सौरभ राजेंद्र जानेराव यांच्या दत्तमंदिर, नाशिकरोड येथील दुकान चोरट्यांनी फोडले. दोन्ही गाळ्यांचे शटर उचकटून खिडक्यांच्या जाळ्या कापून चोरट्यांनी दुकानांमध्ये प्रवेश केला. मोबाइल दुकानात ठेवलेल्या मोबाइलपैकी सुमारे एक लाख ४१ हजार रुपयांचे महागडे एक डझन मोबाइल अज्ञात चोरट्यांनी लंपास केले आहेत. या धाडसी दुकानफोडीमुळे दत्तमंदिर परिसरातील व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. तिसºया घटनेत सातपूर परिसरात इंदिरा लक्ष्मण अपार्टमेंटमधील चोरट्यांनी दोन घरे फोडल्याने रहिवाशांमध्ये दहशत पसरली आहे. या सोसायटीमधून सुमारे तीन लाख दहा हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी हातोहात लंपास केला. विशेष म्हणजे या सोसायटीचा परिसर एक दोन नव्हे, तर आठ सीसीटीव्ही कॅ मेºयांसह सुरक्षारक्षकाच्या देखरेखीखाली आहे.विशेष म्हणजे दुपारी ३ वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी हे धाडस केले. डॉ. मोहन अनंतराव पवार यांच्या फ्लॅटचा दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी प्रवेश करत १४ तोळ्यांचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास केली. तसेच्या पवार यांच्याशेजारी राहणारे अशोक वसंत मानकर यांच्या घरालाही चोरट्यांनी लक्ष्य केले. अवघ्या काही मिनिटांत चोरट्यांनी हा प्रताप करत दोन्ही घटनांमध्ये तीन लाख १० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल पळविला आहे.चौथी घटनेत सिडको परिसरातील एका घरफोडीत ३५ हजारांची रोकड चोरट्यांनी लंपास केल्याची नोंद अंबड पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. येथील प्रेमराज एकनाथ नेरकर यांच्या बंगल्यात चोरट्यांनी दुपारी १२ वाजता घरफोडी करुन ३५ हजारांची रोकड पळविली. तसेच पाचवी घटना गोविंदनगर परिसरात मुंबईनाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. या घटनेत रॉयल अपार्टमेंटमधील अजय दुर्गादास ठाकूर यांचे घर चोरट्यांनी फोडले. घरामधील चार हजार रुपयांची रोकडसह ७५ हजारांचे पाच तोळे सोन्याचे दागिने असा एकूण ८५ हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सणासुदीच्या काळात घरफोड्यांचे ‘विघ्न’एकूणच चोरट्यांनी गणेशोत्सवात भरदिवसा धाडसी घरफोड्यांना आरंभ केल्याने नाशिककरांवर सणासुदीच्या काळात ‘विघ्न’ येऊ लागल्याने संताप व्यक्त केला जात आहे. सीसीटीव्ही कॅमेरे, सुरक्षारक्षकांचीदेखील तमा न बाळगता भरदुपारी सातपूर भागात एका सोसायटीत दोन घरे चोरट्यांनी फोडल्याने आश्चर्य व संतापही व्यक्त होत आहे. सातपूर, अंबड, उपनगर, मुंबईनाका, गंगापूर या पोलीस ठाण्यांच्या हद्दींमध्ये या घटना घडल्या आहेत. पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील सर्वच पोलीस ठाण्यांनी सतर्कता बाळगून परिसरात गस्त वाढविणे गरजेचे आहे. भरदिवसा चोरट्यांकडून नागरिकांची बंद घरे लक्ष्य केली जात असेल तर हे ‘खाकी’पुढील निश्चितच मोठे आव्हान असेल.
गणेशोत्सवात शहरात घरफोड्यांचे सत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2018 1:16 AM