सिन्नर : तालुक्यातील सोनांबे येथील गोवर्धन ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेने परिसरातील आरोग्यसेवक, आशा स्वयंसेविका व शिक्षक या कोरोनायोद्ध्यांचा सन्मान केला. कोरोना संकटात परिसरातील नागरिकांची आरोग्यविषयक काळजी घेणाऱ्या या कोरोना वॉरियर्सला सलाम करण्यात आला. पतसंस्थेचे अध्यक्ष रामनाथ डावरे अध्यक्षस्थानी होते.यावेळी सरपंच पुष्पा पवार, पोलीसपाटील चंद्रभान पवार, सोनांबे कृषी साधन संस्थेचे अध्यक्ष तानाजी पवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. आरोग्यसेविका स्मिता पाटील व पूनम गायकवाड यांच्यासह सोनांबे येथील कल्पना सूर्यवंशी, दीपाली व्यवहारे, मनीषा खेताडे, ललिता डगळे, सोनारी येथील सीमा साबळे व आशा बोºहाडे, जयप्रकाशनगर येथील अनिता कडभाने, वडगाव सिन्नर येथील संगीता साबळे, संगीता भालेराव, अरुणा आढाव, हरसुले येथील उषा मोरे आशा कार्यकर्ती तसेच जिल्हा हद्द तपासणी नाक्याबरोबरच परप्रांतीय नागरिकांना आपल्या राज्यात जाण्यासाठी सेवा करणारे सोनांबेचे भूमिपुत्र व मुसळगाव जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक वसंत गोसावी यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.सरपंच, पोलीसपाटील व पतसंस्था कर्मचारी विनोद रोकडे यांच्यासह कर्मचाऱ्यांचा कोरोना काळातील कार्याबद्दल यावेळी गौरव करण्यात आला.यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष दीपक वारुंगसे, भाऊसाहेब पवार, विठ्ठलराजे पवार, अनिल पवार आदी उपस्थित होते. पतसंस्थेच्या या उपक्रमाचे सर्व सभासद व ग्रामस्थांनी स्वागत केले आहे. यापूर्वी गावातील गरजू पंधरा मजूर कुटुंबीयांना पतसंस्थेने जीवनावश्यक वस्तू भेट दिल्या आहेत.संस्थेचे ज्येष्ठ संचालक शरद रत्नाकर यांनी सूत्रसंचालन केले. व्यवस्थापकीय संचालक संदीप घोडे यांनी संयोजन केले. संतोष डावरे यांनी आभार मानले.
सोनांबे येथे कोरोनायोद्ध्यांचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2020 9:45 PM