नाशिक : सामाजिक, धार्मिक, शिक्षण, बांधकाम व ज्योतिषशास्त्रात विशेष योगदान देणाऱ्या पाच धुरीणांचा शनिवारी पुण्यश्लोक सद्गुरू शिवपार्वती प्रतिष्ठानतर्फे पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला़ परशुराम सायखेडकर नाट्यगृहात प़पू़स्वामिनी स्थितप्रज्ञानंद यांच्या हस्ते पुण्यश्लोक सद्गुरू शिवपार्वती आध्यात्मिक पुरस्कार परमहंस योगी गोरक्षानंद तथा काका महाराज सिन्नरकर, पुण्यश्लोक श्रीराम पराडकर वैदिक पुरस्कार कारंजा येथील नारायण महाराज खेडकर, सर डॉ़ आप्पासाहेब गोसावी लोकसेवा पुरस्कार कराड येथील शेखर चाडेगावकर, शंकरी हरी औरंगाबादकर शैक्षणिक पुरस्कार पुणे येथील डॉ़ व्ही़ झेड़ साळी यांना, तर नंदलाल जोशी वेदवेदांग पुरस्कार नाशिकच्या मयूर मेघश्याम यांना प्रदान करण्यात आला़ स्वामीनी स्थितप्रज्ञानंद यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की, निसर्ग आपल्याकडील प्रत्येक गोष्ट ही प्राणीमात्रांच्या कल्याणासठी निरपेक्ष भावनेने समर्पित करतो़ त्याप्रमाणेच मानवानेदेखील आपले कर्म हे फळाची अपेक्षा न करता निरपेक्ष भावनेने केले पाहिजे़ या भावनेने केलेले कर्म हे चिरकाल आनंद देणारे असते़ निरपेक्ष भावनेने केलेले सामाजिक कार्य, योगा, ग्रंथवाचन व दुसऱ्याप्रती सेवाभाव यामुळे मानवाचे जीवन निश्चितच आनंदमय होत असल्याचेही स्वामिनी म्हणाल्या़ यावेळी त्यांनी शिवपार्वती प्रतिष्ठानच्या उपक्रमाचे कौतुक केले़प्रतिष्ठानचे विश्वस्त डॉ़ मो़ स़ गोसावी यांनी सांगितले की, समाजाचा सकारात्मक दृष्टिकोन हळूहळू कमी होत चालला आहे़ समाजाने उत्कृष्टता, उद्योजकता, सर्जनशीलता व विधायक कार्य करणाऱ्यांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे़ तरुण पिढी ही देशाचे आधारस्तंभ असल्याचे सांगून त्यांनी प्रतिष्ठानच्या ३६ वर्षांच्या कार्याचा आढावा घेतला़ तसेच हे पुरस्कार म्हणजे एक प्रेरणास्त्रोत असल्याचे गोसावी म्हणाले़ यावेळी मान्यवरांच्या हस्ते शिवज्योती या मासिकाचे प्रकाशन करण्यात आले़यावेळी मान्यवरांच्या हस्ते सेवाव्रती अनुबंधी दम्पती, आदर्श संस्था पुरस्कार, गुणवंत व प्रज्ञावंत यांचा गौरव करण्यात आला़ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुग्धा जोशी यांनी केले़ डॉ़ के.आऱ शिंपी यांनी आभार मानले़ यावेळी सुनंदाताई गोसावी, कल्पेश गोसावी, डॉ़ विजय गोसावी, शैलेश गोसावी, डॉ़ दीप्ती देशपांडे, विविध महाविद्यालयाचे प्राचार्य, कर्मचारी यांच्यासह नाशिककर मोठ्या संख्येने उपस्थित होते़ (प्रतिनिधी)
शिवपार्वती प्रतिष्ठानतर्फे पुरस्कार देऊन सन्मान
By admin | Published: February 08, 2015 1:40 AM