सिन्नर : तालुक्यातील वडगाव-सिन्नर येथील शिवप्रेमी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी कन्यारत्न प्राप्त झालेल्या गावातील दाम्पत्यांसह तालुक्यातील शहीद जवानांच्या कुटुंबीयांचा सन्मान केला. महिला व जिवाची बाजी लावून देश रक्षण करणाऱ्या सैनिकांप्रती असलेली कृतज्ञता हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रातील महत्त्वाचे पैलू आहेत. त्यानुषंगाने उपक्रम राबवून शिवजयंती साजरी करण्याचा निर्णय वडगाव-सिन्नर येथील शिवप्रेमी मंडळाने घेतला होता. त्यानुसार वडगाव येथे २०१६-१७ या वर्षात जन्मलेल्या किरण श्रीकांत आढाव, आराध्या शरद पोटिंगे, भाग्यश्री किरण सांगळे, सौम्या विजया सांगळे या चिमुकल्यांच्या आई-वडिलांचा मंडळाच्या वतीने गौरव करण्यात आला. यावेळी त्यांना प्रत्येकी एक रोपटे भेट देऊन त्याचीही पोटच्या मुलाप्रमाणे काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले. शहीद राकेश आनेराव (सोनारी), शहीद शंकर हगवणे (घोरवड), शहीद वसंत लहाणे (सोनगिरी), शहीद श्रीकांत बोडके (वडझिरे), शहीद संदीप ठोक (खडांगळी) यांच्या घरी जाऊन शहिदांच्या कुटुंबीयांना शाल, श्रीफळ व भगवद्गीता देऊन सन्मान करण्यात आला. प्रत्येक शहिदाच्या घरी वटवृक्षाची लागवड करण्यात आली. शिवप्रेमी मंडळाचे संपत शिंदे, विकास शिंदे, रवी कोटकर, सागर कोटकर, नीलेश शिंदे, भरत शिंदे, पप्पू म्हस्के, दादू चव्हाणके, विकास कोटकर, दत्ता शिंदे, राजेश गायकवाड यांनी उपक्रमाचे नियोजन केले. (वार्ताहर)
शहीद जवानांच्या कुटुंबीयांचा सन्मान
By admin | Published: February 22, 2017 11:43 PM