नाशिक : लेखिका, कवयित्री, समीक्षक डॉ. अरुणा ढेरे यांची यवतमाळ येथे होणा-या ९२व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली. कवी, संशोधक, वक्ता असा सगळ्या गुणांचा त्रिवेणी संगम त्यांच्यात पहायला मिळतो. यंदा साहित्य संमेलन अध्यक्षांची निवड ही निवडणुका न घेता झाली आहे. अशाप्रकारे निवडीचा पहिला मान डॉ. अरुणा ढेरे यांना मिळाला आहे. डॉ. ढेरे यांचे नाशिकशी अनोखे बंध आहेत. कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या त्या विश्वस्तही आहेत. त्यांच्या निवडीविषयी साहित्यिकांच्या काही निवडक प्रतिक्रिया...अरुणा ढेरे यांची निवड ही अतिशय सार्थ निवड आहे. सध्याच्या काळात साहित्यातील लिहिता हात म्हणून त्यांचे नाव घेतले जाते. एक अतिशय दमदार अशी परंपरा अरुणा यांच्या मागे उभी आहे. त्या आपल्या लेखनात परंपरा आणि नवता यांची सुंदर सांगड घालतात. खूप वर्षांनंतर कोणतेही राजकारण न होता अध्यक्ष जाहीर झाला आहे. असेच वाङ््मयीन व्यवहार भविष्यात व्हायला हवे. त्यामुळे वादविवाद होणार नाही. - किशोर पाठक, ज्येष्ठ कवीही खूप आनंदाची गोष्ट आहे. त्यांचे लेखन स्वतंत्र शैलीचे आहे. त्यांना वडिलांच्या साहित्याचा वारसा लाभला आहे. तरीपण त्यांनी स्वत:ची वेगळी लेखनशैली जपली आहे. सगळ्या स्त्रीरेखांना न्याय देण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. विपूल लेखन केले आहे. पौराणिक व्यक्तिरेखांचा वर्तमानकाळाशी संवाद घडवून आणला आहे. - वेदश्री थिगळे, लेखिकाअरुणा ढेरे यांनी विविधांगी लेखन केले आहे. कथा, कविता, कादंबरी, वैचारिक, ललित लेखन करणाºया या लेखिकेची सार्थ निवड झालेली दिसते. स्त्री लेखिका म्हणून त्यांचे योगदान मोठे आहे. त्यांच्याकडून अध्यक्षीय भाषणात समकालीन साहित्याची मर्मग्राही विश्लेषण होईल, असा विश्वास वाटतो.- शंकर बो-हाडे, लेखकसाहित्य संमेलनाचे अध्यक्षपद एका स्त्रीला मिळणे ही आनंदाची गोष्ट आहे. त्यांचे लोकसाहित्य, कथा, कादंबºया, ललित लेखन या साºयांचा त्यांच्या भाषणात अभ्यास दिसेल. त्यामुळे तरुणांना आणि साºयांनाच त्यांचे भाषण ऐकण्याची उत्सुकता असेल. - प्रशांत केंदळे, कवीअरुणा ढेरे यांची साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी झालेली निवड अत्यंत आनंददायी आहे. त्यांच्या लेखनाला संशोधनाचा वारसा आहे. लालित्य हा त्यांच्या लिखाणाचा श्वास आहे. त्यांनी ज्या ज्या पुस्तकांना प्रास्ताविक दिले आहे तेदेखील अभ्यासपूर्ण आहे. कवी, संशोधक, वक्ता असा सगळ्या गुणांचा त्रिवेणी संगम त्यांच्यात पहायला मिळतो. याशिवाय अध्यक्षपदी राहताना आपण साहित्यबाह्य काही बोलणार नाही ही त्यांनी मांडलेली भूमिकाही महत्त्वाची आहे. - प्रा. डॉ. वृंदा भार्गवे, समीक्षक
परंपरा, नवतेची सुंदर सांगड घालणाऱ्या लेखिकेचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2018 12:50 AM