त्र्यंबकेश्वर : येथे २/३ दिवसांपासून थंडीच्या लाटेचा प्रभाव वाढला असून येणाऱ्या भाविकांसह स्थानिकांसदेखील हुडहुडीने घेरले आहे. लोकांच्या अंगावर गरम कपड्यात वाढ झाली आहे. तर दिवसादेखील नागरिक गरम व उबदार कपडे घालून वावरत आहेत.साधारणत: दुपारी १ ते ३ वाजेपर्यंत ऊन लागते त्यानंतर मात्र ऊन असूनही गार वारे अंगाला झोंबू लागते. थंडी वाजायला सुरवात होते. तर सायंकाळी ५ नंतर तर जोरदार थंडी वाजते दिवस लहान अशल्याने सूर्यही सायंकाळी सहाच्या सुमारास मावळतो. तर दुसऱ्या दिवशी सहा-साडेसहाला सूर्योदय झाल्यानंतरही थंडी कायम असते.सध्या तापमान सहा ते सात अंश डिग्री सेल्सीयसपर्यंत उतरले आहे. अजूनही उतरण्याची शक्यता आहे. येथील स्थानिकांचा अनुभव आहे की श्रीनिवृत्तीनाथ यात्रेपर्यत थंडी जास्तच असते. येणारे भाविक यात्रेकरू थंडीने कुडकुडतात. आताही त्र्यंबकेश्वरला येणारे यात्रेकरू थंडीने कुडकुडतच दर्शन घेत आहेत. सध्या स्थानिक नागरिकदेखील रात्री ८.०० वाजेपर्यंत आपापले व्यवहार पूर्ण करून लवकर घरी जाणे पसंत करतात.ठिकठिकाणी शेकोट्या पेटत आहे. बच्चे कंपनी व मोठी माणसे शेकोट्या भोवती बसतात. सकाळी सकाळी फिरायला जाणाऱ्यांची गर्दीही वाढू लागली आहे. पहाटे पडणारे धुके तर रात्रीची गुलाबी थंडी काही जणांना मात्र हवीहवीशी वाटते पांघरुणातून त्यांना उठावेसेच वाटत नाही.
हुडहुडी भरली, शेकोट्यांनी धरला जोर!
By admin | Published: December 24, 2015 12:14 AM