लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : संसर्गजन्य म्हणून ओळखल्या जाणाºया व उपचाराअंति पूर्ण बरा होऊ शकणाºया कुष्ठरोग्यांची जिल्ह्यात संख्या वाढत चालली असून, कृष्ठरोगाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी आरोग्य विभागाने हाती घेतलेल्या कुष्ठरोग रुग्ण सर्वेक्षण करण्यास संपावर असलेल्या आशा कर्मचाऱ्यांनी नकार दिला आहे. त्यामुळे ही मोहीम अडचणीत सापडली असून, आरोग्य विभागाने त्यासाठी आता आरोग्य सेवक, सेविकांकरवी सदरचे काम करून घेण्याचे ठरविले आहे. या मोहिमेत जिल्ह्यातील सुमारे ४४ लाख लोकांची यानिमित्ताने तपासणी करण्यात येणार आहे.
कुष्ठरोग रुग्णांची राज्यभर दि. १३ ते २८ सप्टेंबर पर्यंत सर्वेक्षण व तपासणी करण्यात येणार असून, आजवर असे सर्वेक्षण आशा कर्मचा-यांमार्फत केले जात होते. परंतु गेल्या ३ सप्टेंबरपासून आशा कर्मचा-यांचा राज्यव्यापी संप सुरू झाला असून, त्या संपावर गेल्या दहा दिवसांत तोडगा निघू शकलेला नाही. जिल्ह्यातील ३६७२ आशा कर्मचारी या संपात सहभागी आहेत. त्यामुळे कुष्ठरोग रुग्णांची तपासणी कोणामार्फत करावी, असा प्रश्न निर्माण झाला होता. त्यापार्श्वभूमीवर गुरुवारी सकाळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस., जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दावल सावळे यांनी आशा कर्मचारी संघटनेचे नेते कॉ. राजू देसले यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी आशा कर्मचा-यांनी स्पष्टपणे नकार दिला. उलट आशा कर्मचा-यांची कामे आशा कर्मचा-यांनाच करू द्यावे अन्य कोणाची मदत घेऊ नये, अशी विनंतीही केली. दरम्यान, कुष्ठरोग रुग्णांची तपासणी वेळेत पूर्ण करण्याचे आव्हान आरोग्य विभागापुढे उभे ठाकल्याने अखेर त्यासाठी आरोग्य कर्मचा-यांची मदत घेण्याचे ठरविण्यात आले. त्यासाठी आरोग्य सेवक व सेविका अशा पाचशे कर्मचा-यांमार्फत आता हे सर्वेक्षण केले जाणार असल्याचे डॉ. दावल साळवे यांनी सांगितले. या मोहिमेत जिल्ह्यातील ४४ लाख लोकांची तपासणी करण्यात येणार आहे.औषधोपचार करून कुष्ठरोगाला अटकाव व पूर्णत: बरा करता येतो. त्यासाठी राष्टÑीय कृष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत कुष्ठरोग शोध अभियान गेल्या तीन वर्षांपासून राबविण्यात येत आहे. त्यात गेल्या तीन वर्षांत ४० लाख नागरिकांची तपासणी केली असता, त्यातून दरवर्षीप्रमाणे वाढत असल्याचे समोर आले आहे. शहरी भागात कुष्ठरोगाला फारसा थारा नसला तरी, ग्रामीण भागात मात्र कुष्ठरोगाची लक्षणे असलेले रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळले आहेत. सन २०१६-१७ मध्ये ३१५, तर सन २०१७-१८ मध्ये २६४ रुग्ण आढळले. गेल्या वर्षी मात्र हेच प्रमाण पुन्हा वाढून ३५८ इतकी संख्या झाली आहे.