ओझर : वेधशाळेने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार पाऊस पडल्याने उन्हाळ्यात पाण्याच्या टंचाईचा सामना करावा लागलेल्या शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.राज्याचा कॅलिफोर्निया म्हणून प्रसिद्ध असलेल्या निफाड तालुक्याच्या बहुतेक भागाला पाणीटंचाईची बसलेली झळ चिंतेचा विषय ठरू पाहत असताना दोन दिवसांपूर्वी तालुक्यातील काही गावांत वरुणराजाने कृपा दाखविली. आता हीच कृपा उत्तर भागात आणि बागायती पट्ट्यात कायम राहावी यासाठी शेतकरी प्रार्थना करू लागले आहेत. तालुक्यात ऐंशी टक्के अर्थकारण हे शेतीवर अवलंबून असल्याने वेळेत पडलेल्या पावसामुळे अनेक सकारात्मक घडामोडी होत असतात. दुसरीकडे पिण्याच्या पाण्याचा प्रश्नदेखील गंभीर झाला आहे. ओझर, पिंपळगाव परिसराला आता पालखेडच्या मृतसाठ्यावर तहान भागवावी लागत आहे. उत्तरेकडील गावांच्या महिलांनी मागील आठवड्यात तहसील कार्यालयावर हंडा मोर्चा नेला होता. गोदाकाठदेखील मोठ्या प्रमाणावर तहानलेलाच आहे. तेथील शेतकरीदेखील हाताचे पीक वाचविण्यासाठी जिवाचे रान करीत आहे.तालुक्यातील बाजारपेठ शेतीवरच अवलंबून असल्याने व्यापारी वर्गात मंदीचे सावट असल्याने येथे उलढालीसाठी पाऊस पडणे महत्त्वाचे झाले आहे. त्यामुळे व्यापºयांकडून आता तरी तू बरस असे साकडे वरुणराजाला घातले जात आहे.येवल्यासाठी गेल्या आठवड्यात पाणी सोडल्यामुळे नदीकाठच्या गावांचा वीजपुरवठा बावीस तास खंडित केला गेला होता. बागायतदारांनी बंधारे भरून देण्याची केलेली मागणी मान्य न झाल्याने व विजेअभावी द्राक्षबागा तसेच इतर पिके धोक्याच्या वळणावर आहेत. त्यातच जूनच्या पहिल्या आठवड्यात पावसाने सलामी दिल्याने शेतकºयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
निफाड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2019 1:55 AM