नाशिक शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागल्याने महापालिकेचा वैद्यकीय विभाग अलर्ट झाला आहे. ऑक्टोबर महिन्यानंतर शहरातील रुग्णसंख्या घटत गेली आणि अलीकडेच ही संख्या पाचशेच्यावर आली होती. मात्र, पन्हा रुग्ण वाढू लागल्याने सक्रिय रुग्णांची संख्या १ हजार १७६ झाली आहे. बाधितांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन महापालिकेने रुग्णालयात खाटांचे नियोजन सुरू केले आहे.
जुन्या नाशकातील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालय आणि बिटको रुग्णालयात १ हजार १५० खाटांची व्यवस्था आहे. यात बिटको रुग्णालयात मूळ सातशे खाटा असून, तेथे आणखी तीनशे खाटा वाढवल्या जाऊ शकतात. तर कोरोना काळात आरक्षित असलेल्या ९१ खासगी रुग्णालयांतील २ हजार २०० खाटा देखील महापालिकेने उपलब्ध केल्या असून, त्या दृष्टीने नियोजन करण्यात आला आहे. यासंदर्भात वैद्यकीय विभागाने तशा सूचनाच खासगी रुग्णालयांना पाठवल्या आहेत.