नाशिक : जिल्हा रुग्णालयातील अर्भक मृत्यू प्रकरण तसेच विभागीय संदर्भ रुग्णालयातील बंद यंत्रसामग्रीची राज्याचे आरोग्यमंत्री दीपक सावंत हे सोेमवारी (दि़ ११) पाहणी करणार आहेत़ विभागीय संदर्भ रुग्णालयातील नादुरुस्त यंत्रसामग्री त्वरित दुरुस्ती करण्याचे आदेशही सावंत यांनी सभापती रामराजे निंबाळकर यांच्या दालनात शुक्रवारी (दि़ ८) पार पडलेल्या बैठकीत दिले आहेत़ संदर्भ रुग्णालयातील यंत्रणेबाबत आमदार जयवंत जाधव यांनी पावसाळी अधिवेशनात लक्षवेधी मांडली होती़मंत्रालयात झालेल्या या बैठकीत आमदार जाधव यांनी संदर्भमधील मूत्रपिंड प्रत्यारोपण विभाग कागदोपत्रीच चालू असून, त्यासाठी नेफ्रॉलॉजिस्ट, तंत्रज्ञ, आवश्यक मनुष्यबळ आणि यंत्रसामग्रीची पूर्तता झालेली नाही. तसेच डायलिसिससाठी प्रतिदिन २० रुग्णांची प्रतीक्षा यादी असते. डायलिसिस तीन सत्रात सुरू करण्यासाठी रुग्णालयास १० डायलिसिस यंत्र व डायलिसिस खुर्च्यांची तसेच आवश्यक मनुष्यबळाची आवश्यकता असून, देखभाल दुरुस्तीसाठी निधीची तरतूद नसल्यामुळे रुग्णालयातील वातानुकूलित यंत्रणा व लिफ्ट वर्षभरापासून बंद असल्याचेसांगितले़ अमरावती येथील संदर्भसेवा रुग्णालयाप्रमाणे नाशिकच्या संदर्भ रुग्णालयात प्लॅस्टिक सर्जरी, न्यूरोलॉजी आणि पेडियाट्रिकसह इतर विकारांवरील विभाग सुरू करण्यासाठी आणखी दोन मजले वाढवून २०० बेडचा प्रस्ताव शासनाकडे अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. रुग्णालयातील यंत्रणा व देखभाल दुरुस्तीच्या समस्येबरोबरच अतिविशेषोपचार तज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी, परिचारिका आदी मंजूर आकृतिबंधाप्रमाणे ३६७ पदांपैकी ८० पदे रिक्त असल्यामुळे रुग्णांचे हाल होतात़ तसेच महात्मा फुले जीवनदायी आरोग्य विमा योजनेअंतर्गत उपचारासाठी रुग्णांना तीन-तीन महिन्यांची प्रतीक्षा करावी लागत असून, सुधारित आकृतिबंधाचा प्रस्ताव शासनस्तरावर प्रलंबित असल्याचे बैठकीत सांगितले़ या बैठकीला प्रधान सचिव प्रदीप व्यास, आरोग्य संचालक सतीश पवार, सहसंचालक अर्चना पाटील, डॉ. बी. डी. पवार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, संदर्भ सेवा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रल्हाद घुटे, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नाना महाले, हिरामण खोसकर, संजय बनकर, दत्ता पाटील आदी उपस्थित होते.
रुग्णालयाची सोमवारी पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2017 12:34 AM