नाशिक : महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीची सभा होऊन शहरातील महिला बचतगटांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळावी यासाठी सहाही विभागात हाटबाजार सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर नाशिकरोड येथील मनपाच्या विभागीय कार्यालयाच्या इमारतीतील जागेत हाटबाजार सुरू करण्याचे ठरविण्यात आले. महिला व बालकल्याण समितीची सभा सभापती सरोज अहिरे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी सत्यभामा गाडेकर यांनी महिला बचतगटांच्या विविध गृहोपयोगी वस्तूंसाठी हाटबाजार सुरू करण्याचा प्रस्ताव मांडला. त्यासाठी सहा विभागात मनपाच्या विभागीय कार्यालयांमधील जागा उपलब्ध करून देण्याच्या सूचना सभापतींनी दिल्या. महापालिकेच्या अंगणवाड्यांच्या दुरुस्तीसंबंधीही सभापतींनी प्रशासनाला आदेशित केले. महापालिकेच्या एकूण ४१८ अंगणवाड्या असून, ज्या भाड्याच्या जागेत भरतात त्यांना जवळच्या महापालिका शाळांच्या इमारतीत स्थलांतरित करण्याच्या सूचना देण्यात आल्या. सदस्यांनी अंगणवाड्यांना भेटी देऊन पाहणी करण्याचेही ठरविण्यात आले. अंगणवाड्यांना पिण्याचे पाणी, शौचालय या मूलभूत सुविधा पुरविण्यावर चर्चा झाली.महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीची नेमकी कर्तव्ये काय आहेत आणि कोणत्या गोष्टींना प्राधान्यक्रम द्यायचा याची माहिती सभापती सरोज अहिरे यांनी दिली, तर सत्यभामा गाडेकर यांनी प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर त्याच्या अंमलबजावणीबाबत धोरण व नियमावली निश्चित होण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले. महिलांना वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देणे, ज्युदो-कराटेचे प्रशिक्षण देणे यासाठी निधी उपलब्ध करून घेण्यावरही चर्चाझाली. बैठकीला कावेरी घुगे, सत्यभामा गाडेकर, नयन गांगुर्डे, प्रियंका घाटे, शीतल माळोदे, समीना मेनन, पूनम मोगरे आदिंसह उपआयुक्त रोहिदास दोरकुळकर, नगरसचिव ए. पी. वाघ आदी उपस्थित होते.
हाटबाजाराचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 12:37 AM