नाशिक : कोरोनाच्या संकटात सरत्या वर्षाने दिलेल्या कडू आठवणींसोबतच २०२० वर्षाला निरोप देतानाच सुखद आठवणींचे संचित सोबत घेत नव्या उमेदीने उभे राहण्याची ऊर्जा घेऊन २०२१ या नववर्ष स्वागताची अनेकांनी जोरदार तयारी केली आहे. नववर्ष स्वागतासाठी यावर्षी मुंबई, पुण्यासह देशभरातील पर्यटकांना नाशिकची भुरळ पडली आहे. त्यामुळे कोरोना काळात गेल्या सात ते आठ महिन्यांपासून शुकशुकाट असलेले हॉटेल्स, लॉज पुन्हा गजबजू लागले आहेत. त्याचप्रमाणे हॉटेल्स लॉजच्या बुकिंगमध्ये ही १५ ते २० टक्क्यांनी वाढ झाली आहे.
कोरोनाच्या संकटामुळे गेल्या सात ते आठ महिन्यांपासून आलेली मरगळ झटकण्यासाठी नागरिकांनी थर्टीफर्स्टच्या निमित्ताने जोरदार बेत आखले आहे. पर्यंटकांनी यावर्षी उटी, मैसूर, गोवा, शिमला यासारख्या गर्दीच्या ठिकाणांना वगळून निसर्ग सौंदर्याने बहरलेल्या नाशिक आणि कोकणसारख्या खिशालाही परवडणाऱ्या ठिकाणांना पसंती दिली आहे. त्यामुळेच नाशिकमधील हॉटेल्स आणि लॉजचे बुकिंग जवळपास १५ ते २० टक्यांनी वाढले आहे. विशेष म्हणजे ख्रिसमसच्या सुट्टीला लागून आलेल्या साप्ताहिक सुट्यांमुळे नाशिकमध्ये अनेक पर्यटकांनी मुक्काम केला आहे. यातील काहींनी आता हा मुक्काम थेट ३१ डिसेंबरपर्यत वाढविल्याने नाशिकमध्ये यावर्षी थर्टीफर्स्टचा अभूतपूर्व उत्साह पाहायला मिळणार आहे. या नववर्षाच्या उत्साहात कोरोनाने दिलेल्या कटू आठवणींना मागे टाकण्याचा प्रयत्न अनेकांकडून होणार आहे.
इन्फो-
नवीन वर्षाचे उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्याच्या प्रथेने गेल्या काही वर्षापासून नाशिकमध्येही चांगलाच जोर धरला आहे. नाताळच्या सुट्या सुरू होताच आबालवृद्धांना ‘थर्टी फर्स्ट’चेही वेध लागतात. मग थर्टी फर्स्टला कोणताही दिवस असो अनेक जण आवर्जून सुट्टी घेऊन खास नियोजन करतात. असेच नियोजन अनेक नाशिककरांनीही जवळपास आठवडाभरापूर्वीच केल्याने शहरातील हॉटेल्स, लॉज रेस्टॉरेंटस, कृषी पर्यटन केंद्र, फार्म हाऊस अशा ठिकाणी बुकिंग सुरू झाले आहे.
कोट-
ख्रिसमस आणि थर्टी फर्स्टमुळे लॉज आणि हॉटेलचे बुकिंग जवळपास १५ ते २० टक्क्यांनी वाढले आहे. कोरोनाचे संकट असले तरी कही पर्यटंकांनी सुरक्षिततेची खबरदारी घेऊन सहलींचे नियोजन केले आहे. नाशिककडे आणखी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी येथील पर्यटन केंद्रांची पर्यटन महामंडळाकडून जाहिरात होणे आवश्यक आहे.
- संजय चव्हाण, अध्यक्ष, हॉटेल, रेस्टॉरंट असोसिएशन, नाशिक.